मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उघडकीस आणलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील राजकीय वज
.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना हुसेन दलवाई यांनी 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचे प्रकरण, विधान परिषद निवडणुकीतील पैशांचा गैरवापर, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यातील संबंध, तसेच देशातील विविध चालू घडामोडींवर सविस्तर भाष्य केले.
हा भाजप-शिंदे गटातील अंतर्गत वाद!
ऑडिओ क्लिपमधील 500 कोटींच्या उल्लेखावर शंका उपस्थित करत दलवाई म्हणाले, “जर भाजपला मनोज जरांगे पाटील यांना पैसे द्यायचेच होते, तर ते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हातात देण्याची काय गरज होती? भाजप स्वतःही थेट पैसे देऊ शकला असता. शिवाय जरांगे पाटलांना इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे दिले जातील, यात मला तथ्य वाटत नाही. हा सर्व प्रकार भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आपसातील भांडणाचा भाग आहे. भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेत अशाच गोष्टी शिकवल्या जातात.”
सखोल चौकशीची गरज
“ही ऑडिओ क्लिप कोणी तयार केली, कुठे रेकॉर्ड झाली आणि ती जरांगेंपर्यंत कशी पोहोचली, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीची घोषणा केली असली तरी या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होईल असे वाटत नाही. एकनाथ शिंदेंनी ज्या पक्षासोबत घरोबा केला आहे, त्या पक्षाचे खरे चरित्र आता त्यांना हळूहळू समजेल.”
शिक्षकही पैसे घेऊ लागले हे दुर्दैवी
“महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी कधीही अशा प्रकारे पैशांचा महापूर पाहायला मिळाला नव्हता. सध्या विधान परिषदेच्या (पदवीधर आणि शिक्षक) निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत शिक्षकांनाही पैसे वाटले गेल्याचे समोर येत आहे. जर शिक्षकच पैसे घेऊ लागले, तर आपण समाज म्हणून कुठे उभे आहोत, याचा विचार करायला हवा.”
मोदी-शहा एकीकडे अन् संपूर्ण भाजप दुसरीकडे
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात मतभेद असल्याच्या भाजपच्या दाव्याचा दलवाई यांनी समाचार घेतला. “राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दोघेही एकत्रितपणे देशासाठी लढत असून जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांच्यात फूट असल्याचा भाजपचा दावा पूर्णपणे खोटा आणि जाणीवपूर्वक पसरवलेला आहे.”
भाजपमध्येच मोठी दुफळी
“काँग्रेसची काळजी करण्यापेक्षा भाजपने आधी स्वतःच्या पक्षातील अंतर्गत फूट पाहावी. आज भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह एका बाजूला, तर उर्वरित संपूर्ण पक्ष दुसऱ्या बाजूला अशी मोठी दरी निर्माण झाली आहे. आधी ती दरी बुजवण्याचे काम त्यांनी करावे.”
सुशीलकुमार शिंदेंनी मोदींचे कौतुक केले हा निव्वळ बकवास
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले, “भाजपकडून अनेक नेत्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले जाते, त्यात विशेष काही नाही. सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेस पक्षाने अत्यंत मोठी पदे दिली आहेत याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे ते काँग्रेस सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
मोदींच्या कौतुकाचा दावा खोटा
“सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान मोदींची तारीफ केली हा निव्वळ बकवास आहे. पंतप्रधान मोदी या देशाची आणि लोकशाहीची कशी वाट लावत आहेत, ते दलितांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या किती विरोधात आहेत, हे शिंदे साहेबांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे ते कधीही मोदींचे कौतुक करणार नाहीत.”
जामिया मिलिया विद्यापीठातील घोषणाबाजी, नेहा बोरा प्रकरण आणि धर्मांतराचा मुद्दा
देशातील इतर संवेदनशील मुद्द्यांवरही हुसेन दलवाई यांनी रोखठोक मते मांडली. “जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या भिंतींवर ‘फ्री शरजील इमाम’ लिहिणे ही मोठी चूक आहे असे मला वाटत नाही; मात्र ‘फ्री काश्मीर’ अशी घोषणा लिहिणे हा थेट देशद्रोह आहे आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे. डॉ. झाकीर हुसेन यांनी गांधीवादी विचारांवर ही संस्था उभारली असून तिथे कधीही देशविरोधी वातावरण नव्हते. या प्रकरणाची विद्यापीठाने चौकशी करावी.”
सामाजिक कार्यकर्त्या नेहा बोरा यांची पाठराखण
“सामाजिक कार्यकर्त्या नेहा बोरा यांना मोठा बाँड भरण्यास सांगणे चुकीचे आहे. देशात काही गोष्टी पटल्या नाहीत तर त्याविरोधात बोलणे, संघर्ष आणि आंदोलन करणे हा नागरिकांचा संविधानिक हक्क आहे. उच्च न्यायालयाने याचा गांभीर्याने विचार करावा.”
ख्रिश्चन धर्मीयांचे जबरदस्तीने शुद्धीकरण चुकीचे
“पश्चिम बंगालमध्ये ख्रिश्चन धर्मीयांना जबरदस्तीने पूजा करायला लावून त्यांचे शुद्धीकरण (घरवापसी) केले जात असल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. जे लोक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन किंवा शीख झाले आहेत, त्यांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदू धर्मात घेतल्यावर त्यांना कोणती जात देणार? मलाही अनेक वर्षांपूर्वी एकाने हिंदू होण्याबाबत विचारले होते, तेव्हा ‘मग मला ब्राह्मण करणार का?’ असा सवाल मी केला होता. धर्माच्या नावाखाली अल्पसंख्याकांना दिला जाणारा त्रास थांबवून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
——————————————————
हेही वाचा…
SITची नाटकं बंद करा, आधी 500 कोटींचा FIR दाखल करा: ऑडिओ क्लिपवरून राऊतांचा सरकारवर घणाघात, म्हणाले- डुप्लिकेट चाणक्याचे दिवस संपले

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, या प्रकरणाची एसआयटी किंवा फॉरेन्सिक चौकशी करण्याऐवजी आधी एफआयआर दाखल करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. येथे वाचा संपूर्ण बातमी