Headlines

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स अकादमी उभारा:आमदार खोसकरांचे केंद्रीय राज्यमंत्र्यांना निवेदन




इगतपुरी तालुक्यातील भावली येथे आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्पोर्ट‌्स अकादमी उभारावी आणि त्यासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमदार खोसकर यांनी पाठविलेल्या पत्रात इगतपुरी तालुक्यातील भावली येथे प्रस्तावित स्पोर्टस‌् अकादमीचा प्रश्न उपस्थित केला आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण, सराव आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या अकादमीची उभारणी महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. भावली येथे समृद्धी महामार्गालगत पर्यावरणपूरक वातावरणात ही अकादमी उभारण्याचा प्रस्ताव आहे. येथे प्रशिक्षण, निवास आणि खेळांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यास स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांसह नाशिक जिल्ह्यातील इतर खेळाडूंनाही त्याचा लाभ होऊ शकतो. ग्रामीण आणि दुर्गम भागातील गुणवंत खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल, असे खोसकर यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकल्पासाठी संबंधित विभागाकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून, निधीअभावी त्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रस्तावाकडे गांभीर्याने लक्ष देऊन अकादमीसाठी आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी खोसकर यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *