![]()
संतांची भूमी, प्राचीन प्रतिष्ठान नगरी आणि ऐतिहासिक वारशाची ओळख असलेल्या पैठण शहरातील जुन्या भागातील पालथीनगरीकडे विकासाच्या दृष्टीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. इतिहासाच्या अनमोल खुणा जपणाऱ्या या परिसराला नियोजनबद्ध विकासाची जोड मिळाल्यास ऐतिहासिक वारसा संवर्धनासोबतच पर्यटन आणि स्थानिक रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र, केवळ केंद्रीय व राज्य पुरातत्त्व विभागाच्या उदासीन धोरणामुळे या प्राचीन भागातील ऐतिहासिक नगरीचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. पैठणला प्राचीन काळापासून व्यापार, संस्कृती, संतपरंपरा आणि धार्मिक वारशाचा समृद्ध असा इतिहास लाभला आहे. जुन्या पैठणमधील ऐतिहासिक पालथी नगरीची ओळख, तेथील जुन्या वास्तू, अरुंद रस्ते, पारंपरिक वस्तीची विशिष्ट रचना आणि स्थानिक सांस्कृतिक परंपरा यांचा सखोल अभ्यास करून या परिसराचा वारसा दस्तऐवजीकरण करणे महत्त्वाचे आहे. या ऐतिहासिक वास्तूंचे अस्तित्व, त्यांची सध्याची स्थिती आणि संवर्धनाची गरज यांचे प्रत्यक्ष वैज्ञानिक सर्वेक्षण केल्यास विकासाचा एक ठोस आराखडा तयार करता येऊ शकतो, असे मत इतिहास अभ्यासक प्रा. संतोष गव्हाणे यांनी व्यक्त केले आहे. पालथीनगरीच्या विकासासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करून त्यात अल्पकालीन आणि दीर्घकालीन कामांचा समावेश करणे अत्यावश्यक बनले आहे. यामध्ये जुन्या वास्तूंची अधिकृत नोंदणी, माहितीचे संकलन, स्वच्छता मोहीम, वारसा फेरी आणि पर्यटनविषयक जनजागृती अशा उपक्रमांची सुरुवात करता येईल. भूमीचा कायापालट करण्यासाठी आणि पुरातत्त्व विभागाकडून सर्व परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. या परिसराचा विकास साधण्यासाठी नगर परिषद व नागरिक यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही नगराध्यक्षा विद्या कावसानकर यांनी दिली. आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्यास होणार मदत पालथी नगरीचा विकास करताना इतिहासाचे जतन, स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि पर्यटनाच्या नव्या संधी यांचा योग्य समतोल साधला, तर जुन्या पैठणला निश्चितच एक नवी आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्यास मदत होऊ शकते, असे मत रोटरी क्लबचे अध्यक्ष पवन लोहिया, बलराम लोळगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक जितूभाऊ परदेशी आणि बजरंग लिंबोरे यांनी व्यक्त केले आहे.
Source link
पर्यटन विकासाची संधी:पैठण शहरात पालथीनगरीच्या वैभव जतनाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष