![]()
येथील प्रसिद्ध गावरान गुळाच्या नवीन हंगामाचा प्रारंभ शुक्रवारी अत्यंत उत्साहात झाला. स्थानिक व्यापाऱ्याने गुऱ्हाळातून खरेदी केलेला नवीन गूळ रथात ठेवून, आतषबाजी, हलगीचा कडकडाट आणि डफड्याच्या तालावर वाजत-गाजत मिरवणूक काढली. ब्राह्मणाच्या मंत्रोच्चारात आणि जयघोषात हा गूळ विक्रीसाठी दुकानात आणण्यात आला. ही अनोखी मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पिशोरचा गूळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यात कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता भेंडीचा रस, तेल आणि राख यांच्या नैसर्गिक मिश्रणाने शुद्ध आणि चवदार गूळ तयार केला जातो. त्यामुळे या गावरान गुळाला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. दरवर्षी सालाबादाप्रमाणे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरच गुऱ्हाळाची चूल पेटते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने आणि भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने गुऱ्हाळे सुरू होण्यास चार दिवसांचा विलंब झाला. गुऱ्हाळ मालक सूर्यकांत मोकासे यांनी सांगितले की, अत्यल्प पर्जन्यमानामुळे यंदा दसऱ्याचा मुहूर्त टळला आणि गुऱ्हाळ पेटवण्यास उशीर झाला. श्री हिराजी महाराज संस्थानच्या गुऱ्हाळाचे मालक धोंडू नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात या नव्या गुळाचा ठोक दर ८१ रुपये प्रति किलो असून, किरकोळ विक्री ९० रुपये प्रति किलो दराने होत आहे.
Source link
अनोखी मिरवणूक:पिशोरमध्ये नव्या गुळाची मिरवणूक