Headlines

पोस्टल कर्मचाऱ्यांचा आवाज आता राज्यभर बुलंद करणार!:'पोस्टल'च्या महाराष्ट्र-गोवा प्रसिद्धी प्रमुखपदी संतोष यादव




पोस्टल कर्मचाऱ्यांचे प्रश्न, संघटनेची ध्येयधोरणे आणि कर्मचारी हिताचे मुद्दे राज्यभर प्रभावीपणे पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता अहिल्यानगरचे संतोष यादव सांभाळणार आहेत. नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप ‘सी’, महाराष्ट्र व गोवा राज्य संघटनेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली. मालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात झालेल्या सर्कल वर्किंग कमिटीच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. संघटनेची तीन दिवसीय राज्यस्तरीय बैठक सुरू असून, राज्यातील सुमारे ४० विभागांतील १०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पोस्टल कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, विविध समस्या आणि संघटनात्मक कार्याच्या दिशेवर या बैठकीत चर्चा होत आहे. संघटनेचे राष्ट्रीय नेते तथा सेक्रेटरी जनरल शिवाजी वासू रेड्डी यांच्या उपस्थितीत यादव यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता, संघटनात्मक बांधिलकी आणि कार्यशैलीची दखल घेण्यात आली. त्यांचा अनुभव आणि कार्यपद्धती राज्य संघटनेच्या कामाला अधिक बळ देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यादव यांच्या निवडीचा ठराव आशुतोष देशपांडे यांनी मांडला. उपस्थित प्रतिनिधींनी त्याला पाठिंबा दिला. रेड्डी यांनी निवडीची घोषणा केली. या निवडीमुळे अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संघटनेचे उपक्रम आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न राज्यभर पोहोचविण्यासाठी यादव यांची नवी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *