![]()
वसमत ते परभणी मार्गावर वसमत आगाराच्या बसला दुसऱ्या बसने ओव्हरटेक करून कट मारल्याने वसमत आगाराच्या बस चालक करुणा पंडीत यांनी अपघात टाळण्यासाठी बस थेट रस्त्याच्या खाली शेतात उतरवून थांबवली. शुक्रवारी ता. २३ सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत आगाराची वसमत ते परभणी बस सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वसमत येथून परभणीकडे रवाना झाली. यावेळी महिला चालक करुणा पंडीत तर वाहक म्हणून आंबादास दळवी हे कर्तव्यावर होते. त्यांची बस झिरोफाटा येथे आल्यानंतर काही प्रवासी बसखाली उतरले त्यानंतर बस परभणीकडे मार्गस्थ झाली. दरम्यान, झिरोफाट्या पासून काही अंतरावर पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या नांदेड आगाराच्या नांदेड ते बीड या शिवाई बसने ओव्हरटेक करतांना वसमत आगाराच्या बसला कट मारला. नांदेड आगाराच्या बसच्या पाठीमागील भाग वसमत आगाराच्या बसला धडकण्यापुर्वी महिला चालक करुणा पंडीत यांनी बस बाजूला घेतली मात्र अरुंद जागा असल्याने चालक पंडीत यांचे वाहनावरील नियंत्रण सुटत असतांनाही त्यांनी बसचे स्टेअरींग सोडलीच नाही. या परिस्थितीत प्रसंगावधान राखून त्यांनी बस थेट रस्त्याच्या खाली जाऊन एका शेतात नेऊन थांबवली. मात्र नांदेड आगाराच्या बस चालकाने त्यांची बस न थांबवता पुढे निघून गेले. प्रवाशांनी महिला चालक पंडीत यांच्या धैर्याचे कौतूक केले दरम्यान, अवघ्या दोन मिनीटात झालेल्या या घटनेमुळे प्रवासी देखील घाबरून गेले होते. मात्र यावेळी चालक करुणा पंडीत व वाहक दळवी यांनी प्रवाशांनाच धिर दिला. याघटनेमध्ये बसमधील १७ पैकी एकाही प्रवाशाला साधी दुखापतही झाली नाही तसेच बसचेही नुकसान झाले नाही. चालक करुणा पंडीत यांनी प्रसंगावधान राखत दाखविलेल्या समयसुचकतेमुळे मोठा अपघात टळळा. बसमधील प्रवाशांनी महिला चालक पंडीत यांच्या धैर्याचे कौतूक केले. तर वसमत आगार प्रमुख दीपक भुसारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच चालक पंडीत यांचे कौतूक केले. नांदेड आगाराच्या चालकाचा निष्काळजीपणा: करुणा पंडीत, चालक वसमत आगार नांदेड आगाराच्या बस चालकाने निष्काळजीपणा दाखवला. त्यांनी अगदीच अरुंद जागेतून ओव्हटेक केले. त्यामुळे माझे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताची शक्यता होती. मात्र सर्व बळ एकवटून स्टेअरींग सोडलीच नाही अन बस रस्त्याखाली शेतात नेऊन थांबवली. या घटनेमध्ये कोणालाही दुखापत नाही तसेच बसचेही नुकसान झाले नाही.
Source link
हिंगोलीत महिला बसचालकाचे प्रसंगावधान:एसटी शेतात उतरवून मोठा अपघात टाळला, 17 प्रवासी सुखरूप