![]()
गंगापूर-वैजापूर मार्गावरील मुद्देशवाडगाव पाटी येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरच्या धडकेत स्कूटीवरील एका अंगणवाडी सेविकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अंजली कैलास तुपलोंढे (२६, रा. जामगाव, ता. गंगापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, अंजली तुपलोंढे या वैजापूर तालुक्यातील शिवराई येथे आपल्या मामाच्या घरी भेटीसाठी गेल्या होत्या. तेथून परत येत असताना ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंजली तुपलोंढे या शिवराई येथून इलेक्ट्रिक स्कूटीने जामगावकडे परत येत असताना मुद्देशवाडगाव पाटीनजीक मका वाहतूक करणाऱ्या एका विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरने अचानक धोकादायक वळण घेतले. त्यामुळे अंजली यांची स्कूटी थेट ट्रॅक्टरवर जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की अंजली गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळल्या. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि लकी शहा यांना संपर्क साधला. या दोघांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गंगापूर ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अंजली तुपलोंढे यांच्या मृत्यूमुळे जामगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वीच नियुक्ती गंगापूर-वैजापूर मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून रस्ता अरुंद आहे. त्या समृद्धी महामार्गाकडे जाणारी वाहनेही याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. दरम्यान, मृत अंजली तुपलोंढे या काही दिवसांपूर्वीच जामगाव येथील अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून रुजू झाल्या होत्या.
Source link
मामाच्या घरी भेटीला गेलेल्या अंगणवाडी सेविकेचा ट्रॅक्टरच्या धडकेत जागीच मृत्यू:गंगापूर-वैजापूर मार्गावर घडला अपघात