![]()
शहरात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत चोरट्याने धुमाकूळ घातला. मुरारी पार्क परिसरातील चार दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. त्यापैकी एका मोबाईल दुकानातून सहा ते सात हजार, तर लाडगाव रोडवरील किराणा दुकानातून दहा हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. शहरातील अन्य सहा ते सात ठिकाणीही चोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. एकाच रात्री अनेक दुकाने लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुरारी पार्क परिसरातील श्री नारायणगिरी ऑरगॅनिक अॅग्रो, किसान अॅग्रो एजन्सी आणि खांबेकर इलेक्ट्रॉनिक्स या दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाला. याच परिसरातील सीएसएम टेक सोल्युशन या मोबाईल दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील सहा ते सात हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. त्यानंतर शुक्रवारी पहाटे सहा वाजता लाडगाव रोडवरील महेश किराणा दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकटवण्यात आले. येथून दहा हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. दरम्यान, सकाळी सात वाजता गोदावरी कॉलनी परिसरात झाडलोट करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोने दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला असून, गुन्हा दाखल आहे.
Source link
वैजापूरमध्ये 4 दुकानांचे शटर उचकटून चोरीचा केला प्रयत्न:पोलिस गस्त वाढवण्याची मागणी: 17 हजार लंपास