Headlines

मॅग्नेट 2.0 अंतर्गत एक हजार कोटींचे मेगा क्लस्टर्स उभारणार:बाजार समित्यांचे डिजिटायझेशन; एआयच्या मदतीने शेतकऱ्यांना मिळेल बाजारभावाचा अंदाज




फळे, भाजीपाला आणि फुलांच्या मूल्यवर्धनासह प्रक्रिया, साठवणूक आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे एक हजार कोटी रुपयांचे मेगा क्लस्टर्स उभारण्यात येणार आहेत. आंबा, केळी, डाळिंब, लिंबूवर्गीय फळे, काजू आणि हळद या सहा प्रमुख कृषिमालांसाठी खासगी उद्योगांच्या सहभागातून या सुविधा विकसित केल्या जातील. तसेच, राज्यातील बाजार समित्यांचे डिजिटायझेशन करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने शेतकऱ्यांना बाजारभाव आणि विक्रीचे निर्णय घेण्यासाठी मदत केली जाणार आहे, अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) अर्थसाहाय्याने राबविण्यात येणाऱ्या मॅग्नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या टप्प्याच्या अंमलबजावणीपूर्व तयारीसाठी पुण्यातील प्रकल्प मुख्यालयात रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात बाजार समित्यांचे आधुनिकीकरण, पायाभूत सुविधांची उभारणी आणि सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या सक्षमीकरणाचा आढावा घेण्यात आला. बाजारभावाचे एआयद्वारे विश्लेषण महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या पुण्यातील कार्यालयात केंद्रीय बाजार माहिती कक्ष स्थापन करण्याचे नियोजन आहे. या कक्षाद्वारे बाजार समित्या, विविध शासकीय विभाग आणि जागतिक बाजारपेठांमधील माहिती एकत्र केली जाईल. एआयच्या मदतीने या माहितीचे विश्लेषण करून बाजारातील मागणी, दरातील चढ-उतार आणि विक्रीच्या संधींबाबत अहवाल तयार केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांना माल विक्रीचे नियोजन करता येईल, तसेच शासनालाही कृषी पणनविषयक धोरणे ठरविण्यासाठी अद्ययावत माहिती मिळेल. प्रक्रिया आणि निर्यातीला चालना मेगा क्लस्टर्समध्ये शेतमालाची काढणीनंतरची हाताळणी, साठवणूक, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी सुविधा उभारण्यात येणार आहेत. यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती प्रक्रिया निश्चित करून काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना रावल यांनी दिल्या. या प्रकल्पातून शेतमालाचे नुकसान कमी करणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे आणि उत्पादनांना अधिक भाव मिळवून देणे अपेक्षित आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *