Headlines

राणा सूर्यवंशी रुग्णालयातून पसार:पोलिसांच्या चौकशीपूर्वीच गायब, हल्ल्याचा बनाव केल्याचा संशय; तीन मित्रांचाही शोध सुरू




बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी याच्यावरील कथित हल्ल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. स्वतःवर हल्ला झाल्याची तक्रार करणारा राणा सूर्यवंशी पोलिसांच्या चौकशीपूर्वीच पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. राणा याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला की नाही याबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासात पेच निर्माण झाला असून, राणासह त्याच्या संपर्कातील आणखी तीन मित्रांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी बारामती विमानतळाजवळील पालखी महामार्गावरील पायलट ढाब्याच्या परिसरात आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार राणा याने पोलिसांकडे केली होती. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने जवळ येत पिस्तूल दाखवले आणि धारदार शस्त्राने वार केले, असा त्याचा दावा होता. या हल्ल्यात त्याच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि पोटावर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि अन्य पुराव्यांची तपासणी करताना पोलिसांना विसंगती आढळल्याचे वृत्त आहे. त्यानंतर हा हल्ला प्रत्यक्षात घडला नसून, स्वतःवर हल्ला घडवून आणल्याचा बनाव असल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पार्थ अवथडे आणि स्वप्नील कांबळे यांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. कथित कटासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आले आहे. राणाची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाला कळवले होते. मात्र, पोलीस पथक पोहोचण्यापूर्वीच तो रुग्णालयातून निघून गेल्याने त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणातील संशयितांची भूमिका, कथित हल्ल्यामागील उद्देश आणि राणा नेमका कुठे गेला, याबाबतच्या तपासाकडे आता लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *