![]()
प्रहार जनशक्ती सामाजिक संघटनेने सोमवारी (२६ ऑक्टोबर) अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आंदोलन केले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कक्षात तीन तास ठिय्या दिला. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन होते. या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता आणि प्रशासनात खळबळ उडाली. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. यामुळे काही काळ रुग्णसेवेवरही परिणाम झाला. कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ, ईएसआयसी हक्कांची अंमलबजावणी, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी, वेतन थेट बँकेत जमा करणे आणि रुग्णसेवेशी संबंधित साहित्याचा वेळेवर पुरवठा या प्रमुख मागण्या होत्या. प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्यासह बंटी रामटेके, गोलू पाटील, प्रशांत शिरभते, गणेश मारोडकर, मधुकर भुले, इम्रान खान, विक्रम जाधव यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
Source link
प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात ठिय्या आंदोलन:कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 3 तास आंदोलन, रुग्णसेवा प्रभावित