![]()
भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा तयार करणाऱ्या चौघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या एकूण १,१२८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांचे दर्शनी मूल्य पाच लाख ६४ हजार रुपये आहे. नोटा बनविण्यासाठी वापरलेले प्रिंटर, संगणकाचे साहित्य आणि इतर उपकरणेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या आदेशानुसार तपास पथकाने सापळा रचला. सुरवातीला मंडईतील वाहनतळालगत म्हसोबा मंदिरासमोरील रोडवर सलमान राजे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या ८०५ बनावट नोटा आढळल्या. या नोटांचे दर्शनी मूल्य चार लाख दोन हजार पाचशे रुपये आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत सलमानने आणखी तीन साथीदारांची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार तपास पथक सातारा आणि कोल्हापूर येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शाबान फिरोज अन्सारी, विशाल विलास गलांडे आणि अभिजीत रावसाहेब कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर त्यांनाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपींकडून नोटा बनविण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर, मॉनिटर, वायरलेस कीबोर्ड, माऊस, सीपीयू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या उपकरणांची एकूण किंमत २९ हजार १०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच अन्सारीच्या राहत्या घरातून पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या आणखी ३२३ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. त्यांचे दर्शनी मूल्य एक लाख ६१ हजार पाचशे रुपये आहे. अशा प्रकारे दोन्ही कारवायांमध्ये एकूण पाच लाख ६४ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त झाल्या. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी देशमाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई केली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबूब मोकाशी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
Source link
बनावट नोटा तयार करणाऱ्या चौघांना अटक:5 लाख 64 हजारांच्या नोटा जप्त, प्रिंटर-संगणकासह साहित्यही ताब्यात