![]()
प्रतिनिधी | कन्नड मनात विकार असलेल्या माणसाला कधीही शांती लाभत नाही. संसाराचा गाडा जर सुखाने पुढे न्यायचा असेल तर पती-पत्नीमध्ये परस्परांबद्दल प्रेम आणि आदरभाव असणे आवश्यक आहे. केवळ बाह्य सौंदर्यावर न भुलता अंतर्गत सौंदर्याला महत्त्व देऊन केलेला संसार नेहमी सुखाचा होतो आणि त्या संसारात कधीही वितुष्ट येत नाही, असे प्रतिपादन राम महाराज लव्हारे आळंदीकर यांनी केले. देवळाणा (ता. कन्नड) येथे नवरात्रोत्सवानिमित्त देवी मातेची आरती व संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कीर्तनसेवा बजावताना ते बोलत होते. कथेदरम्यान महाराजांनी मज हृदयी सद्गुरू येणे तारिलो हा संसारपुरू.. म्हणुनी विशेष अत्यादरू विवेकावरी या ओवीचे निरूपण केले. ते म्हणाले, हे कलियुग आहे आणि हा भवसागर पार करण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. ज्याच्या हृदयात सद्गुरू वसलेले आहेत, तो त्यांच्या कृपेने संसारातून तरून जातो. आजकाल शेजारच्याचेच नव्हे तर सख्या भावाचेही कल्याण झालेले इतरांना रुचत नाही, असा काळ निर्माण झाला आहे. आपल्या आई-वडिलांशिवाय आणि संतांशिवाय आपले चांगले व्हावे असे इतर कोणालाही वाटत नाही. अंधारात वाट चुकलेला प्रवासी जसा गुराख्याच्या मशालीच्या उजेडात मार्गक्रमण करतो, तसेच आपणही आई-वडील आणि संतांनी दाखवलेल्या सन्मार्गावर चालले पाहिजे. घरातीलच नव्हे तर समाजातील सर्व महिलांना आदराने व सन्मानाने वागवले पाहिजे. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचे रूप असते, हे जाणून तिचा आदर केला पाहिजे. या सोहळ्यात सावता भजनी मंडळाने उत्तम साथसंगत केली. अमोल महाराज सोनवणे, यादव कांबळे, राहुल सोनवणे, फकीरराव सोनवणे आणि दामूअण्णा सोनवणे यांच्या भजनी मंडळाच्या गायनाने कार्यक्रमात रंगत आणली. कन्नड तालुक्यातील देवळाणा येथील कीर्तनास हजारो भाविकांची उपस्थिती होती. युवकांनी अध्यात्माकडे वळावे : प्रा. डॉ. संजय गव्हाणे जिल्हा परिषद सदस्य प्रा. डॉ. संजय गव्हाणे म्हणाले, शिवमहापुराण, कीर्तन आणि भजन अशा आध्यात्मिक कार्यक्रमांतून समाजमनाची खऱ्या अर्थाने जडणघडण होते. हल्लीचा तरुण वर्ग मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने त्याच्यातील विचारसरणी उथळ होत चालली आहे. त्यामुळे युवकांनी अशा आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन संस्कार अंगीकारले पाहिजेत. या प्रसंगी बाबुराव गाधव, शिवाजी मालोदे, बाळू बनकर, रामजी नानासाहेब सोनवणे, गणेश सोनवणे, सोमनाथ गवळी, साहेबराव डोळस, मधुकर डोळस, अनिकेत राठोड, कचरू माणिकराव सोनवणे, संतोष सुराशे आणि अनिकेत राठोड यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Source link
स्त्रीमध्ये देवीचे रूप; महिलांचासन्मान हाच धर्म- राम महाराज:सद्गुरू, माता-पित्यांचा आदर करण्याचे आवाहन