![]()
कर्जत तालुक्यातील खांडस आणि भीमाशंकर अभयारण्यालगतच्या जंगलात ‘टोरेंट’ या गुजरातच्या कंपनीकडून सुरू असलेल्या वृक्षतोडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता स्वतः मैदानात उतरले असून, ते २८ ऑक्टोबर रोजी सकाळी या वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी कर्जत येथील पोलीस ग्राउंड मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून, या सभेत ते आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर अत्यंत सडकून टीका केली आहे. ‘झाडं कापून कुठला ग्रीन प्रोजेक्ट होतो?’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला ‘हायड्रोइलेक्ट्रिक ग्रीन प्रोजेक्ट’ म्हटले होते. यावर देशपांडे यांनी संतप्त सवाल उपस्थित केला. “दीडशे-दोनशे वर्षांची झाडे तोडून तुम्ही कसला विकास करत आहात? झाडे कापून कुठला ग्रीन प्रोजेक्ट होऊ शकतो? स्थानिक लोकांच्या मते, नद्यांवर आणि डोंगरात छोटे प्रकल्प होऊ शकतात, त्यासाठी एवढी मोठी जंगलतोड करण्याची गरजच नाही. गुजरातची ‘टोरेंट’ कंपनी या सरकारची जावई आहे का?” असा घणाघात त्यांनी केला. ‘अधिकृत रेकॉर्डनुसार ३२ हजार झाडे तोडण्याची परवानगी’ प्रत्यक्ष परिस्थितीचे विदारक चित्र मांडताना देशपांडे म्हणाले, “आम्हाला झाडांवर लिहिलेला २०७५ हा आकडा दिसला. पण स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार त्याहूनही अधिक झाडे कापली गेली आहेत. वनविभागाने ३२ हजार झाडे तोडण्याची परवानगी अधिकृतरीत्या दिलीच कशी? ग्रामपंचायतींचा कुठलाही ठराव नसताना आणि जनसुनावणीत लोकांच्या प्रश्नांची उत्तरे न देता ही परवानगी दिली गेली आहे.” ‘अवैध नाही, म्हणजे वैध कशी?’ वनविभागाने ‘कुठलीही अवैध वृक्षतोड सुरू नाही’ असे स्पष्टीकरण दिले होते. यावर देशपांडे यांनी सडेतोड उत्तर दिले. “जर ही अवैध नाही, तर मग वैध कशावरून ठरते? लोकांना रस्ता हवा असतो तेव्हा वनविभाग सांगतो की झाडे कापता येणार नाहीत. आता ही वृक्षतोड वैध कशी झाली? यावर वनविभागाने थोबाड उघडून उत्तर द्यावे,” असे आव्हान त्यांनी दिले. फेक नॅरेटिव्ह आणि सरकारवर हल्लाबोल “हा प्रकल्प महाराष्ट्राचाच असून विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पसरवला जात आहे,” या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा देशपांडे यांनी समाचार घेतला. “हा नॅरेटिव्ह ठरवण्यासाठी सकाळी सुशील कुलकर्णी, श्वेता शालिनी यांचा ‘कॉंकलेव्ह’ झाला असेल. वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्रद्रोही कसे ठरवायचे, याची रणनीती या कॉंकलेव्हमध्ये ठरली असेल आणि त्यानुसारच मुख्यमंत्री बोलत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. ‘दिल्लीतील दोन गुजराती सह्याद्रीचे भवितव्य ठरवणार नाहीत’ ग्रामस्थांना त्यांच्याच जमिनीवर जाण्यापासून रोखल्याचा मुद्दा उपस्थित करत देशपांडे म्हणाले, “आज तिथे फलक लावून ग्रामस्थांना मज्जाव केला जात आहे. पण दिल्लीत बसलेले दोन गुजराती लोक सह्याद्रीचे भवितव्य ठरवू शकणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. पर्यावरणाचा ऱ्हास करणारे सगळे प्रकल्प महाराष्ट्रात आणायचे आणि गिफ्ट सिटीसारखे चांगले प्रकल्प गुजरातला न्यायचे, हाच पॅटर्न सुरू आहे.” २८ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे सकाळी जंगलाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा करतील. या पाहणीनंतर संध्याकाळी होणाऱ्या सभेत ते काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ——————– हेही वाचा… 500 कोटी आले कुठून अन् गेले कुठे?: PMLA अंतर्गत ED चौकशी करा, संजय राऊतांचे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दोन पानांचे सविस्तर पत्र लिहिले आहे. यामध्ये राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ED) ‘पीएमएलए’ (PMLA – Prevention of Money Laundering Act) अंतर्गत चौकशी करण्याची आक्रमक मागणी केली आहे. सविस्तर वाचा
Source link
टोरेंट कंपनी काय तुमची जावई आहे का?:भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून संदीप देशपांडे संतापले, म्हणाले – झाडं कापून कुठला ग्रीन प्रोजेक्ट होतो?