![]()
अहिल्यानगरच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात अनेक वर्षे सक्रिय राहिलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर (वय ७०) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने त्यांना आनंदऋषीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी त्यांच्या घराशेजारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने अहिल्यानगरच्या राजकीय, कृषी आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. केडगावच्या सरपंचपदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास नगर तालुका पंचायत समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वापर्यंत पोहोचला. नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. राजकारणासोबतच संदीप उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी उद्योग क्षेत्रातही काम केले. शेतकऱ्यांच्या कृषिमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नेप्ती येथे उपबाजार समिती उभारण्याच्या प्रक्रियेत त्यांचा पुढाकार महत्त्वाचा मानला जातो. चिचोंडी पाटील येथेही उपबाजार समितीसाठी जागा उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी सहभाग घेतला होता. बाजार समितीच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे कृषी क्षेत्राशी त्यांचे नाते दृढ राहिले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ते माजी महापौर संदीप कोतकर, उद्योजक सचिन कोतकर, अमोल कोतकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा सचिन जगताप यांचे ते वडील होत. त्यांच्या अंत्यसंस्काराला आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, महापौर ज्योती गाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी निवासस्थानी भेट देऊन शोक व्यक्त केला. अंत्यसंस्कारावेळी खासदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, मोनिका राजळे, विठ्ठलराव लंघे, पद्मश्री पोपटराव पवार, महापौर ज्योती गाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील एक अनुभवी नेतृत्व हरपले आहे. राजकारण, सहकार अन् उद्योग क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व हरपले / वृत्त पान ४.
Source link
"नेप्ती उपबाजार'चे शिल्पकार भानुदास कोतकर यांचे निधन:राजकीय, सहकार आणिकृषी क्षेत्रातून श्रद्धांजली