![]()
जनसेवा सहकारी बँक लि., हडपसर, पुणे यांच्या वतीने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी समर्पित असलेल्या “वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू” या संस्थेस यंदाचा ‘जनसेवा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. धनादेश स्वरूपात एक लाख एक हजार रुपये, सन्मान चिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. मागील आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जनसेवा सहकारी बँकेचे सेवक दत्तात्रय गाडे, संतोष शिंदे आणि आरती हगवणे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘गुणवंत सेवक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हडपसर येथील विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहात झालेल्या या वर्धापन दिन समारंभास मा. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, उपाध्यक्ष रवि तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष पोळेकर, ”वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू” संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ.श्री.नंदकुमार मुलमुले व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ” सहकाराच्या एकूण परंपरेमध्ये १९७२ मध्ये हडपसरमध्ये सुरू झालेली जनसेवा सहकारी बँक ही आज पुण्यातील विश्वासाची बँक बनली आहे. याचा प्रत्येक पुणेकराला अभिमान आहे . कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपण समाजाचं देणं लागतो ही भावना ठेवावी आणि समाजाला संघटित करून प्रश्न सोडवावेत ही संघाची मूलभूत शिकवण आहे. संघ विचार घेऊन अनेक कार्यकर्ते समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये पोहोचले आणि त्यातूनच संघाच्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संस्था उभ्या राहिल्या. या संस्थांमागे नफ्यापेक्षा समाजसेवेची भावना होती म्हणूनच त्यांना समाजाचा विश्वास मिळाला. अशा संस्थांपैकी एक जनसेवा सहकारी बँक ही संस्था आहे.” ” कुठलीही सहकारी संस्था इतका काळ चालवायची असेल ती टिकवून ठेवायची असेल तर त्याला विश्वासार्हता महत्त्वाची असते. सहकारामध्ये विश्वासार्हता असेल तर ती संस्था कधीही बंद पडत नाही. ती संस्था कायम यशाची शिखरे पादाक्रांत करते. जनसेवा बँकेची गेल्या ५४ वर्षांची वाटचाल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे ,” अशा शब्दांत मोहोळ यांनी बँकेच्या कार्याचा गौरव केला.
Source link
वृक्षदाई प्रतिष्ठान, देहूला जनसेवा बँकेचा पुरस्कार प्रदान:पर्यावरण संवर्धनासाठी 1 लाख 1 हजार रुपयांचा सन्मान