Headlines

जीविधाच्या 16 व्या पर्यावरण व्याख्यानमालेस सुरुवात; ईशान पहाडे यांनी केले:किटकांचे जग मानवाच्या कल्पनेपेक्षाही अद्भुत असल्याचे मत व्यक्त




जीविधा संस्थेतर्फे आयोजित १६ व्या पर्यावरण व्याख्यानमालेची सुरुवात उत्साहात झाली. ‘शोधयात्रा – युवा संशोधकांच्या नजरेतून निसर्गाचा अनोखा प्रवास’ या संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी कीटक अभ्यासक ईशान पहाडे यांनी ‘कीटक व आपण’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘जीविधा’ चे राजीव पंडित, वृंदा पंडित यांनी स्वागत केले.उषःप्रभा पागे,वामन जोगळेकर,अनुपमा जुवेकर वासुदेव तांबोळी तसेच पर्यावरणप्रेमी पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्या दिवशीच्या व्याख्यानात ईशान पहाडे यांनी कीटकांची वैशिष्ट्यपूर्ण शरीररचना, त्यांची संवेदनाक्षमता, वर्तन आणि पर्यावरणातील महत्त्वाची भूमिका यांविषयी रंजक माहिती दिली.कीटकांची ओळख करून देताना त्यांनी त्यांच्या शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन प्रमुख भाग असल्याचे सांगितले. कीटकांना सहा पाय असतात. त्यांच्या जीवनचक्रातील वेगवेगळ्या अवस्थांमध्ये शरीररचनेत बदल होतात. प्रत्येक कीटकाची रचना, सवयी आणि वर्तन वेगवेगळे असते. काठीकीटक , काजवे आणि सिकाडा यांसारख्या कीटकांची उदाहरणे देऊन त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.कीटकांच्या शरीररचनेपासून ते त्यांच्या सामाजिक वर्तनापर्यंत आणि पर्यावरणातील योगदानापर्यंत अनेक पैलूंची माहिती या व्याख्यानातून मिळाली. कीटक हे केवळ छोटे जीव नसून निसर्गातील अन्नसाखळी, विघटन प्रक्रिया आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत, हा संदेश या व्याख्यानातून देण्यात आला. कीटकांची दृष्टी आणि संवेदनाक्षमता कीटकांचे जग मानवाच्या कल्पनेपेक्षाही अधिक अद्भुत आहे. सर्व कीटकांना मानवाप्रमाणे सर्व रंग दिसत नाहीत. त्यांच्या प्रजातीनुसार रंग ओळखण्याची क्षमता वेगवेगळी असते. काही कीटकांच्या संयुक्त डोळ्यांमध्ये अनेक दृश्य घटक असतात. त्यांच्या शरीरावरील विविध अवयवांचा उपयोग परिसरातील बदल ओळखणे, अन्न शोधणे आणि जोडीदारापर्यंत पोहोचणे यासाठी होतो. काही कीटकांमध्ये दिशाज्ञानासाठी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रासारख्या संकेतांचा वापर करण्याची क्षमताही आढळते.मधमाश्या आणि मुंग्या या कीटकांमध्ये दिसणारे सांघिक कार्य विशेष उल्लेखनीय आहे. मधमाश्या अन्नाचा स्रोत कुठे आहे, त्या ठिकाणी पोहोचण्याची दिशा कोणती आणि अन्न किती उपलब्ध आहे, यासंबंधीची माहिती इतर मधमाश्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे नृत्य करतात. या संवादामुळे समूहातील इतर मधमाश्यांना अन्नाच्या ठिकाणाचा शोध घेण्यास मदत होते. मुंग्याही एकत्रितपणे काम करून अन्न गोळा करणे, घरटे बांधणे आणि वसाहतीचे संरक्षण करणे अशी कामे करतात. या उदाहरणांतून कीटकांमधील संवाद, नियोजन आणि सहकार्याची वैशिष्ट्ये समोर येतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *