![]()
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 500 कोटींच्या कथित क्लिपचा मुद्दा उपस्थित केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, दोन्ही बाजूंनी जरांगे यांच्यावरही टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगे यांना थेट राजकीय पक्ष स्थापन करण्याचा खोचक सल्ला दिला असून, ते जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला आहे. प्रताप सरनाईक म्हणाले, मराठा समाजाला सर्वाधिक न्याय जर कोणी दिला असेल तर तो एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. एखादा राजकीय नेता जसजसा मोठा होत जातो तसतसे त्याच्यावर टीका होत जाते. मनोज जरांगे हे जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत, त्यांनी एखादा पक्ष स्थापन करावा, असा खोचक सल्ला सरनाईक यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी एक ऑडिओ क्लिप उघड केली होती, ज्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांना 500 कोटी रुपये दिल्याचे म्हटले आहे. यावरून जरांगे यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करत, हे 500 कोटी रुपये नेमके कुठे गेले, असा थेट सवाल उपस्थित केला. जरांगे यांच्या या आरोपानंतर शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी बचावात्मक पवित्रा घेत थेट मनोज जरांगे यांच्यावरच पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावर बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, प्रदीप पूर्णेकर हत्या ही राजकीय कारकीर्दीतील निर्घुण हत्या आहे. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु, या राजकीय हत्येचा वापर काही जणांकडून स्वतःच्या फायद्यासाठी केला जात आहे. राजकीय परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे हे पूर्णेकरांच्या घरी गेले नाहीत, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी आणि त्यांना सणापूर्वीच वेतन मिळावे, यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, शासनाने एसटी महामंडळाला सप्टेंबर 2026 मधील प्रवासी सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 391 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्याचा प्रशासनाचा शब्द पाळला जाणार असून, एसटीच्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Source link
'जरांगेंनी आता राजकीय पक्ष काढावा':मंत्री प्रताप सरनाईक यांचा खोचक सल्ला; जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंवर टीका करत असल्याचा आरोप