![]()
महायुतीतील मित्रपक्षांमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना, शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी या वादावर भूमिका स्पष्ट केली आहे. नवनाथ बन यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना सामंत यांनी, नवनाथ बन यांना या निवडणुकांची संपूर्ण पार्श्वभूमी माहिती नसावी, असे म्हटले. तसेच, “नवनाथ बन यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत त्यांची भूमिका मांडावी; मात्र एकनाथ शिंदे साहेबांना सल्ला देऊ नये. ते त्यांना सल्ला देण्याइतके मोठे आहेत का?” असा सवालही त्यांनी केला. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणताही गैरसमज नसल्याचे सांगत, निवडणुकीदरम्यान शिवसेनेने महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही सामंत यांनी केला. उदय सामंत म्हणाले की, निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील मित्रपक्षांमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याचे दिसत आहे. मात्र, हे गैरसमज वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर निर्माण झालेले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात समन्वय आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले नाहीत, तर विषय संपतो. एखाद्या कार्यकर्त्याचा किंवा नेत्याचा गैरसमज झाला म्हणून पक्षाची भूमिका ठरत नाही. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत, तर भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतात. त्यामुळे दोन्ही पक्षांतील समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरच्या निकालावर भाजप उमेदवारानेच मांडली भूमिका नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या विधानाचा संदर्भ देत उदय सामंत यांनी नवनाथ बन यांच्या आरोपांना उत्तर दिले. सामंत म्हणाले की, सुधाकर कोहळे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून निवडणुकीतील मतांच्या बाद होण्याबाबत भूमिका मांडली होती. सुमारे 9,000 मते बाद झाली नसती, तर निकाल वेगळा लागू शकला असता, असे कोहळे यांनी म्हटल्याचे सामंत यांनी सांगितले. भाजपच्या उमेदवारानेच आपल्या पराभवाबाबत ही भूमिका मांडली असताना, त्यासाठी धनंजय मुंडे यांना जबाबदार धरणे योग्य नसल्याचे सामंत यांनी सूचित केले. धनंजय मुंडे यांनी काय विधान केले, याच्याशी पक्षाचा थेट संबंध जोडणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे पदवीधर निवडणुकीत शिवसेनेने प्रचार केल्याचा दावा पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीबाबत बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की, या निवडणुकीदरम्यान गैरसमज निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांना फोन केला होता. त्यानंतर संबंधित उमेदवाराच्या पतीसोबत कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. पुढील दिवशी प्रचारासाठी दोन ठिकाणी मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यांना आपण आणि शंभूराज देसाई उपस्थित होतो, असे सामंत यांनी सांगितले. सातारा आणि सांगली येथेही मेळावे घेण्यात आले. पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी सभा घेतल्या आणि प्रचार केला. या प्रचाराचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सामंत यांनी केला. त्यामुळे शिवसेनेने महायुतीच्या उमेदवाराला मदत केली नाही, असा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीसाठी मंगेश चिवटेंची माघार पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील परिस्थिती वेगवेगळी होती, असेही उदय सामंत यांनी सांगितले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचार करण्यात आला; मात्र शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करण्याची भूमिका घेण्यात आली होती. सामंत यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला चार जागांबाबत निर्णय झाला होता, तर पाचव्या जागेबाबत चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आणि शिवसेनेनेही मंगेश चिवटे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर पुण्यातील उमेदवारासाठी मैत्रीपूर्ण लढत करण्याची भूमिका पक्षाने घेतली. यासाठी मंगेश चिवटे यांना माघार घ्यायला लावून सचिन सानप यांना शिवसेनेने पुरस्कृत केले. यानंतरही भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी आपला सातत्याने संपर्क होता. महायुतीच्या उमेदवारांना कशा पद्धतीने मदत करता येईल, याबाबत चर्चा सुरू होती. कौस्तुभ गावडे यांच्याशीही संपर्क होता, असे सामंत यांनी सांगितले. मात्र, काही लोकांनी सचिन सानप यांना ओळखत नसल्याचे सांगितले. अशा प्रकारे उमेदवाराचे खच्चीकरण करणे योग्य नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेने काही काळ शांत भूमिका घेतली असली, तरी पदवीधर मतदारसंघासाठी प्रचार केला होता. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता निकाल लागला. या निवडणुकीमुळे सचिन सानप यांचे नाव राज्यभर चर्चेत आले, असेही सामंत म्हणाले. अमरावतीच्या उदाहरणावरून भाजपला प्रत्युत्तर अमरावतीच्या निवडणुकीचा संदर्भ देत उदय सामंत यांनी भाजपवर आरोप करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली नसल्याचे सांगितले. अमरावतीतील संगीता शिंदे यांनी आपले बंधू आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचे जाहीरपणे सांगितले होते, असा उल्लेख सामंत यांनी केला. अशा परिस्थितीत भाजपने अमरावतीत शिवसेनेच्या विरोधात काम केले, असा आरोप शिवसेनेने केला नाही. पुणे मतदारसंघाची पार्श्वभूमी आणि महाराष्ट्रातील इतर मतदारसंघांची पार्श्वभूमी वेगळी होती. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. नवनाथ बन यांचा काही गैरसमज झाला असेल, तर तो वेळीच दूर करावा. निवडणुकीच्या संदर्भातील वस्तुस्थिती लक्षात न घेता आरोप-प्रत्यारोप करणे टाळावे, असे आवाहनही सामंत यांनी केले. ‘एकनाथ शिंदेंना सल्ला देऊ नये’ पत्रकारांनी नवनाथ बन यांनी मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात केलेल्या विधानाबाबत विचारले असता, उदय सामंत यांनी त्यावर आक्षेप घेतला. मागील काळात मनाचा मोठेपणा दाखवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिल्याचा उल्लेख करून सल्ले देणे योग्य नसल्याचे त्यांनी सूचित केले. “धनंजय मुंडे यांच्या बाबतीत त्यांनी त्यांची भूमिका मांडावी; पण एकनाथ शिंदे साहेबांना सल्ला देऊ नये. मी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देण्याइतका मोठा आहे का? त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांना सल्ला देण्याइतके ते मोठे आहेत का?” असा सवाल सामंत यांनी केला. धनंजय मुंडे यांनी काय केले किंवा त्यांनी कोणते पत्र काढले, याची दखल एकनाथ शिंदे घेतील. त्यामुळे त्याबाबत थेट शिंदे यांना सल्ले देण्याऐवजी संबंधित विषयावर आपली भूमिका मांडावी, असे सामंत यांनी म्हटले. ‘शिंदे-फडणवीस यांच्यात गैरसमज नाहीत’ महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत का, या प्रश्नावर सामंत यांनी स्पष्ट नकार दिला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात समन्वय असून दोन्ही नेत्यांमध्ये गैरसमज नसल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीच्या काळात भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही अनेकदा चर्चा झाली होती. समन्वय समितीच्या माध्यमातून विविध विषयांवर चर्चा होत असते. त्यामुळे या चर्चांची आणि निवडणुकीतील घटनांची संपूर्ण माहिती नवनाथ बन यांना नसावी, असे सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी बंडाचे पाऊल उचलले नसते, तर राज्यातील परिस्थिती वेगळी राहिली असती, असेही सामंत यांनी नमूद केले. नवनाथ बन हे तरुण आणि आपले चांगले मित्र आहेत; मात्र निवडणुकीची संपूर्ण पार्श्वभूमी त्यांना माहिती नसल्यामुळे ते गैरसमजातून बोलत असावेत. त्यांचा गैरसमज पक्षाचे प्रवक्ते दूर करतील, असे सांगत उदय सामंत यांनी महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा…. धंगेकरांवर एकनाथ शिंदेंनी तातडीने कारवाई करावी:त्यांनी केसाने गळा कापला, मित्रपक्षाच्या हव्यासापोटी पुणे पदवीधर सीट गमावली- नवनाथ बन मित्रपक्षाच्या एका जागेच्या हव्यासापोटी आमचा उमेदवार पुणे पदवीधर मतदारसंघात पराभूत झाला. तर छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चव्हाण यांना शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी विरोध करत त्यांच्या विरोधात काम केले. पुण्यात तर रवींद्र धंगेकर यांनी मतदारांना जाहीर पणे आवाहन केले की भाजपच्या उमेदवाराला मतदान करू नका. धंगेकर यांनी केसाने गळा कापण्याचा निर्णय घेतला असेल तर एकनाथ शिंदेंनी धंगेकर यांच्यावर कारवाई केली पाहिजे. शिक्षक मतदारसंघापूरते आम्ही समजू शकतो पण पदवीधरमध्ये उमेदवार नसताना भाजपचे काम केले नाही, असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…
Source link
‘नवनाथ बन यांना निवडणुकीची पार्श्वभूमी माहिती नसावी’:उदय सामंतांचा टोला, ‘एकनाथ शिंदेंना सल्ला देण्याइतके ते मोठे आहेत का?’