![]()
वन्यजीव संशोधनाच्या पद्धतींमध्ये काळानुसार मोठे बदल झाले असून, आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे संशोधन अधिक अचूक आणि शास्त्रीय झाले आहे. कॅमेरा ट्रॅप, जीपीएस टॅग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि जनुकीय तंत्रज्ञान यांसारख्या साधनांमुळे वन्यजीवांच्या हालचाली, वर्तन आणि अधिवासाचा अभ्यास करणे अधिक सोपे झाले आहे, असे मत वन्यजीव संशोधक हृषिकेश करंदीकर यांनी व्यक्त केले. ‘जीविधा’ संस्थेतर्फे आयोजित 16 व्या पर्यावरण व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी ‘वन्यजीव संशोधन : काल, आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते. ‘शोधयात्रा – युवा संशोधकांच्या नजरेतून निसर्गाचा अनोखा प्रवास’ ही या व्याख्यानमालेची संकल्पना आहे. राजेंद्रनगर येथील इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात ही व्याख्यानमाला सुरू आहे. व्याख्यानाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक राजीव पंडित आणि वृंदा पंडित यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वन्यजीव संशोधनाच्या प्रवासाविषयी सांगताना करंदीकर म्हणाले, की पूर्वी प्रत्यक्ष निरीक्षण आणि हाताने केलेल्या नोंदी यांवर संशोधन प्रामुख्याने अवलंबून होते. आता व्हीएचएफ ट्रॅकिंग, जीपीएस टॅग, आरएफआयडी टॅग, उपग्रह तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांमुळे संशोधनाला नवी दिशा मिळाली आहे. प्रमाणित संशोधन पद्धतींचा वापर केल्यामुळे निरीक्षणांची अचूकता आणि निष्कर्षांची विश्वासार्हता वाढत आहे. परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करताना पक्ष्यांची उपस्थिती हा महत्त्वाचा निकष ठरतो. त्याचप्रमाणे मुंग्यांसारख्या लहान जीवांचे अस्तित्वही परिसंस्थेच्या आरोग्याचे निदर्शक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात वन्यजीव संशोधनात तंत्रज्ञानाची भूमिका वाढणार असली, तरी स्थानिक समुदायांचा सहभाग आणि निसर्गाशी संबंधित स्थानिक ज्ञान यांनाही महत्त्व द्यावे लागेल, असे त्यांनी नमूद केले.
Source link
आधुनिक तंत्रज्ञानामुळे वन्यजीव संशोधन अधिक अचूक:हृषिकेश करंदीकर यांचे मत; कॅमेरा ट्रॅप, जीपीएस टॅग-एआयचा वापर वाढला