Headlines

पुण्यात पराभव नाही तर भाजप प्लस झाली:कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू; भाजप नेते राजेश पांडे यांचा दावा, नेतृत्व बदलाच्या चर्चेला दिला पूर्णविराम




महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निकालानंतर सत्ताधारी महायुतीत अंतर्गत चिखलफेक आणि पराभवाचे खापर फोडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश पांडे यांनी निकालांवर पक्षाची अधिकृत आणि वस्तुनिष्ठ आकडेमोड मांडली आहे. “राजकीयदृष्ट्या विचार केला तर या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा तोटा झालेला नसून थेट फायदाच झाला आहे. गेली 20 वर्षे ज्या पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजपचा ताबा नव्हता, ती जागा भाजपने खेचून आणली आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघात मागच्या वेळी आमचा उमेदवार तब्बल 48,000 मतांनी पराभूत झाला होता; यावेळी मात्र निसटत्या अवघ्या 8,500 मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे विधानपरिषदेत भाजप ‘प्लस’ झाली असली, तरी आम्ही नक्की कुठे कमी पडलो याचे संघटनात्मक स्तरावर सखोल आत्मचिंतन नक्की करू,” अशी महत्त्वपूर्ण माहिती राजेश पांडे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष हे सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक पार पडत आहे. बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत संवाद भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांच्या पुणे दौऱ्याबाबत आणि बैठकीविषयी माहिती देताना राजेश पांडे म्हणाले, “बी. एल. संतोष हे एका मोठ्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी पुण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.” लोकप्रतिनिधींशी संवाद “या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी परिचय आणि गप्पा मारण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सर्व आजी-माजी नगरसेवक, पुणे जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. हा कोणत्याही राजकीय आणीबाणीचा कार्यक्रम नसून, राष्ट्रीय संघटन मंत्र्यांचा स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद घडवून आणणारा संघटनात्मक उपक्रम आहे.” 20 वर्षांनंतर शिक्षक मतदारसंघ खेचला विधानपरिषदेच्या निकालांचे विश्लेषण करताना पांडे यांनी पराभवाचा नरेटिव्ह खोडून काढला. “पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा गेली 20 वर्षे भाजपच्या ताब्यात नव्हती, तिथे यावेळेस भाजपने विजय मिळवला आहे. तर पुणे पदवीधरची जागा मुळात राष्ट्रवादीकडे होती, ती भाजपकडे नव्हती.” मताधिक्यातील मोठी सुधारणा “मागच्या निवडणुकीत पदवीधरमध्ये भाजप उमेदवाराचा तब्बल 48,000 मतांनी मोठा पराभव झाला होता. मात्र यंदा अत्यंत चुरशीच्या लढतीत हा पराभव अवघ्या 8,500 मतांच्या फरकावर आला आहे. त्यामुळे ताकदीच्या दृष्टीने भाजपचे नुकसान झालेले नसून मतांची टक्केवारी आणि जागांमध्ये भाजप प्लसच राहिली आहे.” आढावा नक्की घेणार “कोणताही अधिकृत अहवाल दिल्लीला पाठवण्यापेक्षा, आम्ही नक्की कुठे कमी पडलो? कुठे नियोजन चुकले? काय उपाययोजना करायला हव्या होत्या? याचा प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरावर संघटनात्मक आढावा नक्की घेतला जाईल.” मतदान 20 टक्क्यांवरून थेट 55 टक्क्यांवर स्थानिक नगरसेवकांनी काम न केल्यामुळे पराभव झाला, या आरोपांचे खंडन करताना त्यांनी सांगितले. “गेल्या 20 वर्षांचा पुणे पदवीधर निवडणुकीचा इतिहास पाहिला, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी असायची. यंदा मात्र स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळेच हे मतदान 20 टक्क्यांवरून थेट 52 ते 55 टक्क्यांपर्यंत गेले आहे. मतदान 20 वरून 55 टक्क्यांवर जाते, याचा स्पष्ट अर्थ असा की नगरसेवकांनी जमिनीवर उतरून काम केले आहे. तरीही मतांच्या बेरजेत जे काही थोडेफार कमी पडले असेल, त्या त्रुटींवर आम्ही आत्मपरीक्षण करू.” नेतृत्व बदलाच्या चर्चांना कोणताही अर्थ नाही रवींद्र धंगेकर आणि विरोधकांकडून सुरू असलेल्या नेतृत्व बदलाच्या मागणीवर बोलताना राजेश पांडे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “महाराष्ट्रात नेतृत्व बदल होणार अशा वावड्यांना काहीही अर्थ नाही. इतक्या मोठ्या राज्यपातळीवरील विषयावर बोलणारा मी मोठा नेता नाही; परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सक्षम नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राचा चौफेर विकास होत आहे आणि त्यांच्याच नेतृत्वात भाजप प्रत्येक निवडणुकीत उत्तम कामगिरी करत आहे.” मित्रपक्षाच्या भूमिकेचे परीक्षण “पुण्यात शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी विरोधात प्रचार केल्यामुळे पराभव झाला का, यावर सध्या जाहीर बोलण्यापेक्षा पराभवाला कोणत्या गोष्टी जबाबदार ठरल्या, याचा पक्षांतर्गत विश्लेषणात नक्कीच आढावा घेतला जाईल,” असे राजेश पांडे यांनी शेवटी नमूद केले. ———————————————————– हेही वाचा… महायुती टिकवायची असेल तर झारीतले शुक्राचार्य रोखा:भाजपचा शिवसेनेला इशारा; नवनाथ बन म्हणाले-12 पक्ष फिरून आलेल्या धंगेकरांनी फडणवीसांवर बोलू नये! महायुतीविरोधात काम करणारे रवींद्र धंगेकर अब्दुल, सत्तार यांच्यावर कारवाई करा, महायुती टिकवायची असेल तर झारीतले शुक्राचार्य रोखा, असा खणखणीत इशारा भाजपने आज शिवसेनेला दिला. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांचा माकडछाप म्हणून उल्लेख केला. नवनाथ बन यांनी काल भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ प्रवीण दरेकरांसह भाजपचे इतर नेते मैदानात उतरले. आज पुन्हा विधान परिषद निवडणूक निकालावरून महायुतीमध्ये जोरदार जुंपली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *