Headlines

धंगेकरांना सिरियसली कोण घेणार?:2022ला पाठीत खंजीर खुपसला, किशोरी पेडणेकर यांचा पलटवार; पूर्णेकर हत्याकांडावरूनही डागली तोफ




“रवींद्र धंगेकरांसारख्या लोकांना कोणी किती गांभीर्याने घ्यायचे? पक्ष बदलत फिरत राहायचे आणि प्रसिद्धीसाठी वाटेल तशी विधाने करायची. 2022 मध्ये ज्यांनी उद्धवजींच्या पाठीत उघडपणे खंजीर खुपसला, त्यांना धंगेकर ‘एक रक्त’ कसे काय म्हणू शकतात? आमच्या पक्षात किंवा नेतृत्वात अशा मनोमिलनाची कोणतीही चर्चा नाही आणि ती कधी होईल असे वाटतही नाही,” अशा शब्दांत मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रवींद्र धंगेकरांच्या दाव्याची हवा काढली. त्याचवेळी दादर येथील एका कला क्षेत्राच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) एकाच मंचावर आल्याच्या घटनेवर बोलताना, “फडणवीस घराणे आणि ठाकरे घराणे ही दोन्ही महाराष्ट्रातील अत्यंत सुसंस्कृत घराणी आहेत. त्यांनी एका मंचावर एकत्र येऊन महाराष्ट्राची उच्च राजकीय संस्कृती जपली, हे पाहून संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच समाधान वाटले,” अशी सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर यांनी ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील पोलिसांचा संथ तपास, अमित साटम यांचे वृक्षतोडीवरील आरोप, संजय गायकवाड यांची विधाने आणि महायुतीतील अंतर्गत कलहावर टोलेबाजी केली. 25-25 हजारांच्या भाडोत्री आरोपींचा खरा ‘गॉडफादर’ कोण? ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडावर पोलिसांच्या तपासाची लक्तरे वेशीवर टांगताना पेडणेकर म्हणाल्या, “वागळे किंवा ठाण्यातील त्या टायगर श्रॉफच्या प्रकरणात पोलीस आणि नेते पटापट धावून जातात आणि तातडीने कारवाई होते. मात्र, पूर्णेकर हत्याकांडाला आज 27 ते 28 दिवस उलटून महिना होत आला, तरी मूळ सूत्रधारांवर कारवाई का होत नाही? राजकीय वैमनस्यातून ही निर्घृण हत्या झाली आहे का, याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे.” भाडोत्री मारेकऱ्यांमागील खरा सूत्रधार शोधा “ठाण्यात पकडलेले आरोपी हे केवळ 25-25 हजार रुपयांचे भाडोत्री गुंड असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मग या आरोपींना नक्की कोणाच्या सांगण्यावरून चालवले गेले? या कटामागे ठाण्यात बसलेला खरा ‘गॉडफादर’ कोण आहे, हे पोलिसांनी निष्पक्षपणे शोधून काढले पाहिजे.” शिंदे सेनेच्या आंदोलनात स्थानिक नगरसेवक गायब “काल ठाण्यात शिंदे सेनेने आंदोलन केले, तेव्हा त्यांच्याच पक्षातील ठाण्याचे स्थानिक नगरसेवक अनुपस्थित होते. ‘आम्ही एकनाथ शिंदेंसाठी येऊ, पण मिनाक्षी शिंदेंसाठी येणार नाही’ अशी चर्चा त्यांच्या अंतर्गत गोटात आहे. आम्हाला त्यांच्या वादात पडायचे नाही; पण एका निष्पाप कार्यकर्त्याच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा.” 2005 मध्ये अमित साटम महापालिकेत काय झोपा काढत होते का? मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी 2005 मधील मध्य वैतरणा प्रकल्पातील वृक्षतोडीवरून केलेल्या आरोपांना त्यांनी सडेतोड उत्तर दिले. “मध्य वैतरणा प्रकल्प शिवसेनेच्या सत्ताकाळात झाला आणि त्यामुळेच आज लाखो मुंबईकरांची तहान भागत आहे. या प्रकल्पात झाडे कापली गेली आणि बीडमध्ये भरपाई म्हणून झाडे लावली नाहीत, असा बालिश कांगावा साटम करत आहेत. 2005च्या महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत नव्हती का? स्वतः अमित साटम महापालिकेत नगरसेवक होते, मग तेव्हा ते काय गाई-म्हशी हाकत होते की झोपा काढत होते?” सत्तेत असताना दम असेल तर चौकशी करा “केंद्रात आणि राज्यात तुमचेच सरकार आहे. जर तुमच्यात दम असेल, तर तोंडाच्या वाफा दवडण्यापेक्षा आणि पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा थेट अधिकृत चौकशी लावा आणि दोषींवर कारवाई करा. उगीच चौथ्या इयत्तेतील मुलासारखे बालिश राजकारण करू नका.” अर्ध्या चड्डीत फिरणाऱ्या संजय गायकवाडांवर काय बोलावे? आमदार संजय गायकवाड यांच्या शेतकरी आत्महत्यांवरील वादग्रस्त विधानावर त्यांनी संताप व्यक्त केला. “जो माणूस अर्ध्या चड्डीत फिरतो आणि अर्ध्या चड्डीतून धनलक्ष्मीचे प्रदर्शन करतो, त्या व्यक्तीवर मी काय भाष्य करावे? एकनाथ शिंदेंनी असले दोन-चार टाकाऊ आणि बेताल लोक स्वतःच्या गटात गोळा केले आहेत; आता त्याची फळे त्यांनीच भोगावीत.” महायुतीचे नेते रस्त्यावर एकमेकांचे कपडे उतरवत आहेत निलेश राणे, नवनाथ बन आणि प्रवीण दरेकर यांच्यात रंगलेल्या अंतर्गत वादावर त्या म्हणाल्या, “भाजप प्रवक्ते धंगेकरांना लायकी काढतात आणि दुसरीकडे निलेश राणे भाजपच्या प्रवक्त्यांना लायकीत राहण्याचा इशारा देतात. हे पाहून महाराष्ट्राची जनता म्हणतेय की महायुतीचे नेते आता भररस्त्यात एकमेकांचे कपडे उतरवत आहेत. ही युती विचाराने किंवा मनाने एकत्र आलेली नाही, तर केवळ सत्तेसाठी डोकी मोजणारी तात्पुरती व्यवस्था आहे.” समुद्रातील 29 तरंगत्या होर्डिंग्जचा धिक्कार “मुंबईच्या समुद्रात 29 ठिकाणी तरंगते एलईडी होर्डिंग्ज लावण्याची योजना म्हणजे निसर्गाचे विद्रूपीकरण आहे. मुंबईत आधीच होर्डिंग्ज पडून निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता समुद्रातील जलचरांना आणि सौंदर्याला धोका निर्माण करून जाहिरातदारांचे खिसे भरण्याचे काम पर्यटन आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालय करत आहे,” अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी शेवटी केली. —————————————————————– हेही वाचा… फडणवीसांसह ठाकरे बंधू एकाच मंचावर: कार्यक्रमाआधी बंद दाराआड चर्चा, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या भूमिका घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने हे नेते एकत्र आले. विशेष म्हणजे, सार्वजनिक कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने या भेटीबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *