![]()
आळंदी येथे १७ व्या नांदी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. साहित्य संमेलने औपचारिक न राहता अखंड चळवळ व्हावीत, असे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे म्हणाले. विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने संयुक्तपणे हे संमेलन आयोजित केले होते. समारोप कार्यक्रमात डॉ. मोरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. १०० व्या साहित्य संमेलनानिमित्त आयोजित ‘संमेलनांची नांदीयाळी’ महाराष्ट्रात साहित्याचे नवे वातावरण निर्माण करेल, असे त्यांनी सांगितले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. उल्हासदादा पवार होते. माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, खेडचे आमदार बाबाजी काळे आणि नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक राजेश पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मसापचे कार्यवाह सुनील महाजन, राजन लाखे, प्रभाकर ओव्हाळ, बापूसाहेब मोरे, उषाताई विश्वनाथ कराड आणि माईर्स एमआयटीच्या महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटेही उपस्थित होते. डॉ. मोरे म्हणाले, “मराठी ही जगातील अशी एकमेव भाषा आहे, जिचे आद्यग्रंथकार अमृताशीही पैज जिंकण्याचे आव्हान देतात. आपण अमृतालाही लाजवणाऱ्या समृद्ध भाषेचे वारसदार आहोत. हे वैभव जपणे आपले कर्तव्य आहे.” डॉ. उल्हास पवार म्हणाले, “संत विचारांची दिशा आज संपूर्ण जगाला तारू शकते. संत ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयापर्यंत पोहोचून खऱ्या अर्थाने ‘विश्वप्रार्थना’ बनले आहे. ही संतपरंपरेची आणि मराठी संस्कृतीची जागतिक उंची आहे.” राजेश पांडे म्हणाले, “नांदी संमेलने आढावा घेण्यासाठी नाहीत. पुढील १०० वर्षे मराठी भाषा डिजिटल युगात कशी टिकेल, सक्षमपणे वाढेल आणि युगानुकूल ठरेल, याचा पाया रचण्यासाठी ही संमेलने आहेत.” आमदार बाबाजी काळे म्हणाले, “मराठी भाषेबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. संत वाङ्मयातील मानवतावादी विचार मराठी भाषेतून जनमानसापर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे.” प्रा. स्वाती कराड-चाटे म्हणाल्या, “संत साहित्याच्या विचारांतून आपल्याला ‘तीर्थक्षेत्रांकडून ज्ञानतीर्थ क्षेत्रांकडे’ वाटचाल करायची आहे. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी संत साहित्याचा शिक्षणात समावेश झाला पाहिजे.” आळंदीतील फ्रुटवाले धर्मशाळेत संमेलनाची सुरुवात माऊलींच्या मंदिरापासून काढलेल्या ग्रंथदिंडीने झाली. त्यानंतर हभप गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्री भजन झाले. ‘तीर्थक्षेत्राचे ज्ञानतीर्थ क्षेत्रात परिवर्तन’ या विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली विचारमंथन झाले. यात हभप यशोधन महाराज साखरे, हभप बापूसाहेब मोरे आणि सचिन परब सहभागी झाले.
Source link
साहित्य संमेलने चळवळ व्हावीत:डॉ. सदानंद मोरे यांचे मत; आळंदीत 17 व्या नांदी संमेलनाचा समारोप