![]()
“ज्यांनी राजकीय कारकिर्दीसाठी 12 पक्ष फिरले, ज्यांच्या घरातील लोकांचे पुणे महापालिकेत डिपॉझिट जप्त झाले आणि ज्यांना पुणेकरांनी लोकसभा व विधानसभेत घरी बसवले, त्या ‘माकडछाप’ व्यक्तीने देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर बोलण्याची लायकी नाही. महायुतीत राहून पुण्यात भाजप उमेदवार स्मिता जाधव यांच्याविरोधात अधिकृत सोशल मीडिया पेजवरून प्रचार करणाऱ्या रवींद्र धंगेकरांवर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडपणे बंडखोरी करणाऱ्या अब्दुल सत्तारांवर शिवसेना काय कारवाई करणार? अमरावतीत बंडखोरांवर भाजपने ६ वर्षांसाठी निलंबनाची कुऱ्हाड चालवली, मग शिवसेनेनेही धंगेकर आणि सत्तारांवर तशीच कठोर कारवाई करून युतीधर्म पाळावा,” असा सणसणीत आणि थेट सवाल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी विधानपरिषद निकालांनंतर मित्रपक्षाकडून सुरू असलेली अंतर्गत चिखलफेक, रवींद्र धंगेकर व अब्दुल सत्तार यांची वक्तव्ये, संजय राऊतांचे ‘1 एप्रिल’चे भाकीत, ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण आणि शिवसेनेच्या अस्मितेवरून सुरू असलेल्या वादावर आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडली. 12 पक्ष फिरलेल्या धंगेकरांनी भाजपला शहाणपण शिकवू नये! रवींद्र धंगेकर यांच्या विधानांवर घणाघात करताना नवनाथ बन म्हणाले, “ज्यांना एका पक्षात आपले राजकीय करिअर घडवता आले नाही, जे मनसे, काँग्रेस, शिवसेना करत 12 घरे फिरून आले, त्या माकडछाप व्यक्तीची अवस्था ‘माकडाच्या हाती कोलीत’ अशी झाली आहे. ज्यांना स्वतःच्या कुटुंबातील दोघांचे डिपॉझिट महापालिकेत वाचवता आले नाही, ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीका करत आहेत.” भाजपची निष्ठावंत पार्श्वभूमी “आम्ही अभाविप (ABVP) पासून काम करत, पत्रकारिता करून भाजपचे कमळ हातात घेतले आहे. धंगेकरांसारखे 12 चिन्ह आणि 12 पक्ष बदलून स्वार्थासाठी उड्या मारणारा मी कार्यकर्ता नाही. त्यामुळे अशा उथळ नेत्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही.” धंगेकर अन् सत्तारांच्या वक्तव्याला एकनाथ शिंदेंची संमती आहे का? महायुतीतील घटकपक्षांच्या भूमिकेवर त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केले. “पुणे पदवीधर निवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून भाजप उमेदवार स्मिता जाधव यांच्या पराभवासाठी उघडपणे प्रचार केला. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडल्याची जाहीर कबुली दिली.” शिंदेसेनेने अधिकृत भूमिका मांडावी “धंगेकर आणि सत्तार जे बोलत आहेत, ते शिवसेनेचे अधिकृत मत आहे का? त्यांच्या या भूमिकेला पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेत्यांचे समर्थन आहे का? या साध्या, सरळ प्रश्नाचे उत्तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेला दिले पाहिजे.” बच्चू कडूंना आव्हान बन म्हणाले, “अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्याचा आरोप बच्चू कडू करत आहेत; मात्र तिथे बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्काळ 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. मग पुण्यात भाजपचा आणि संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचा घात करणाऱ्यांवर शिवसेना कारवाई करणार का?” संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राची ‘गॉन केस’ संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या टीकेची खिल्ली उडवताना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, “राज्यात 1 एप्रिल रोजी मोठी उलथापालथ होईल, असे दावे संजय राऊत करत आहेत. 1 एप्रिल हा दिवसच ‘एप्रिल फूल’ करण्याचा असतो. राऊत आधी जनतेला मूर्ख बनवत होते, आता स्वतःच्या कार्यकर्त्यांना एप्रिल फूल बनवत आहेत.” ते पुढे म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकीत उबाठा गटाला मतपत्रिकेवर अवघी 3,000 आणि 6,000 मते मिळाली आहेत. स्वतःचा दारुण पराभव झाला असताना दुसऱ्याच्या घरात पोरगं झालं म्हणून पेढे वाटण्याचे उद्योग राऊतांनी थांबवावेत.” भाजपचे मताधिक्य सर्वाधिक “पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला 1,02,000 मते मिळाली आहेत, नागपुरात पहिल्या पसंतीक्रमाची सर्वाधिक मते भाजपला मिळाली, तर पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप विजयी झाला आहे. महायुतीने एकत्रित काम केले असते तर निकाल 5-0 असा लागला असता.” भांडूपमध्ये ड्राय डे रद्द करा “संजय राऊत म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘गॉन केस’ आहे. सकाळी नशेशिवाय ते पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत. त्यामुळे २ ऑक्टोबर आणि २६ जानेवारीच्या ड्राय डेच्या दिवशी भांडूपमध्ये तरी सूट द्यावी, अशी त्यांची मागणी असते,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. पूर्णेकर हत्येतील आरोपींना बेड्या ठोकल्या; कोणालाही पाठीशी घालणार नाही ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर भाजपची बाजू स्पष्ट करताना ते म्हणाले, “प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली असून हत्यारे जप्त केली आहेत. चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही कायद्यातून सुट दिली जाणार नाही.” ओरिजिनल शिवसेना शिंदेंचीच “शिंदेंची शिवसेना खरी की उबाठाची, याचा निकाल जनतेने महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आधीच लावला आहे. बाळासाहेबांचे विचार सोडून राहुल गांधींच्या दावणीला बांधलेली उबाठा हीच खरी डुप्लिकेट आहे,” असा घणाघात नवनाथ बन यांनी शेवटी केला., ——————————————————— हेही वाचा… फडणवीसांसह ठाकरे बंधू एकाच मंचावर: कार्यक्रमाआधी बंद दाराआड चर्चा, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या भूमिका घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने हे नेते एकत्र आले. विशेष म्हणजे, सार्वजनिक कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने या भेटीबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. सविस्तर वाचा
Source link
12 पक्ष फिरून आलेल्या धंगेकरांनी फडणवीसांवर बोलू नये:धंगेकर अन् सत्तारांच्या बंडखोरीला शिंदेंचे समर्थन आहे का? नवनाथ बन यांचा थेट सवाल