![]()
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा एक भलामोठा ढिगारा अचानक कोसळल्याने ४ ते ५ जण या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले असून, आतापर्यंत दोघांना ढिगाऱ्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सध्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. इंदापूर तालुक्यातील बिजवडी हद्दीत हे काम सुरू असतानाच बाजूलाच असलेला मातीचा मोठा ढिगारा अचानक खाली कोसळला. हा ढिगारा इतका मोठा होता की, तिथे उपस्थित असलेल्यांना बाजूला होण्याची किंवा पळून जाण्याची संधीही मिळाली नाही, आणि ते मातीखाली गाडले गेले. स्थानिकांची तत्परता आणि बचावकार्य मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याचे पाहताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि इतर कामगारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हाताने आणि मिळेल त्या साधनाने माती उपसून त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढले. या दोघांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासन घटनास्थळी दाखल ढिगाऱ्याखाली अद्यापही काही जण अडकलेले असल्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले असून, जेसीबी आणि इतर यंत्रणांच्या साहाय्याने माती हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. उर्वरित नागरिकांना लवकरात लवकर आणि सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे बिजवडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून गर्दी पांगवण्याचे आणि मदतकार्याला गती देण्याचे काम सुरू आहे. —————– हेही वाचा.. संभाजीनगरात सपोर्ट दुरुस्ती करताना नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला: 3 मजूर बचावले, 1 दबल्याची भीती, चिकलठाणा आठवडी बाजार परिसरातील घटना
चिकलठाणा येथील आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत चार मजूर मलब्याखाली अडकले होते. सुदैवाने त्यापैकी ३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, एक मजूर अद्यापही मलब्याखाली दबल्याचा संशय असून, रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दल आणि पोलिसांकडून त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. सविस्तर वाचा
Source link
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी दुर्घटना:कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला, 4 ते 5 जण अडकल्याची भीती