![]()
पुण्यातील स्वारगेट स्थानक परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून सहा किलो गांजा, मोबाइल आणि रोकड असा ४ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त गांजाची किंमत ३ लाख रुपये आहे. अटक केलेल्यांची नावे आशिष रमेश शिंदे (वय २१, रा. पीएमटी कॉलनी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि आशितोष उर्फ स्वप्नील सोमनाथ कांबळे (वय २७, रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) अशी आहेत. त्यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक स्वारगेट स्थानक परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी शिंदे आणि कांबळे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले आणि त्यांच्याकडील पिशवी तपासली. त्यात गांजा आढळला. पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक निरीक्षक अफरोज पठाण, पोलीस कर्मचारी योगेश कुंभार, संदीप देवकाते, सतीस चव्हाण, सुमीत यादव, शरद धांडे, विनोद निंभोरे, प्रशांत कळसकर आणि सुरेखा साबळे या पथकात होते. ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन लुटले पादचारी ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन त्यांच्याकडील ७० हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याची घटना मुकुंदनगर भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चार दिवसांपूर्वी धनकवडी भागात बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाला लुटण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे महर्षीनगर परिसरात राहायला आहेत. ते मुकुंदनगरमधील सुजय गार्डन परिसरातून निघाले होते. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘आमच्या वडिलांचे निधन झाले आहे. मंदिरात पैसे दान करायचे आहे. आत्मशुद्धीसाठी तुमच्याकडील अंगठी द्या. अंगठी पैशांना लावून परत करतो’, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर हातचलाखी करुन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडील अंगठी चोरली. चोरटे तेथून पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील शेळके तपास करत आहेत.
Source link
स्वारगेट स्थानकाजवळ गांजा विक्रीसाठी आलेले दोघे अटकेत:पोलिसांनी 6 किलो गांजा, मोबाइल आणि रोकड जप्त केली