![]()
पुण्यात ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल समूहाच्या सहा नवीन उत्पादन सुविधांचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर ही शहरे ईव्ही उद्योगाची महत्त्वाची केंद्रे बनत असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. तसेच बी. एल. संतोष, ज्येष्ठ उद्योजक डॉ. अभय फिरोदिया, ईका मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता आणि सुनंदा मेहता यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण आणि जीवाश्म इंधनावरील आयात कमी करण्यास मदत होईल. ऑटोमोबाईल उद्योग रोजगारनिर्मिती आणि पूरक उद्योगांच्या विकासाला चालना देतो. पुढील तीन वर्षांत महाराष्ट्राला ५० हजार इलेक्ट्रिक बसची गरज आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यातील उद्योगांनी उत्पादन क्षमता वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी राज्यात हरित ऊर्जेचा वाटा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. चार्जिंग व्यवस्था उभारण्यासाठी राज्य सरकारने आराखडा तयार केला आहे. वाहन उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने प्रमुख महामार्गांवर चार्जिंग सुविधांचे जाळे उभारले जाईल. त्यासाठी जागा, परवानग्या आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असे फडणवीस म्हणाले. पिनॅकल समूहाच्या एका उत्पादन सुविधेत ५० टक्के महिला कर्मचारी काम करतात. त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी देण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचारी कंपनीचा भागधारक असण्याचे मॉडेलही कौतुकास्पद असल्याचे फडणवीस म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनांसाठी किफायतशीर दरात वीज उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातील. पिनॅकल समूहाच्या नव्या उत्पादन सुविधांमुळे राज्यातील ईव्हीची वाढती मागणी महाराष्ट्रातच पूर्ण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारताने जागतिक नेतृत्व करावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असून, ऑटोमोबाईल उद्योग हा भारतीय औद्योगिक क्षेत्राचा कणा आहे. देशातील वाहन उद्योगाचा विस्तार, रोजगारनिर्मिती आणि निर्यातीत मोठे योगदान आहे. त्यामुळे भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने जागतिक स्तरावर अग्रस्थान मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवावे. इलेक्ट्रिक वाहने, ट्रक आणि बस निर्मितीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
Source link
महाराष्ट्रात ईव्ही उत्पादन वाढवणार:महामार्गांवर चार्जिंग सुविधांचे जाळे उभारणार; राज्य देशातील प्रमुख केंद्र बनेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास