![]()
खरिपापाठोपाठ रब्बी आणि पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेसाठी गंगापूर व वैजापूर तालुक्यातील नांदूर मधमेश्वर कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. हक्काच्या पाण्यासाठी गंगापूर शहराला जोडणाऱ्या तीन प्रमुख मार्गांवर एकाच दिवशी रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. वैजापूर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर पंडितअण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दिवसांपासून शेतकरी उपोषणाला बसले आहेत. दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठा मोर्चा काढूनही प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. पाण्यासाठीचा हा आक्रोश एकाच वेळी तालुक्यातील तीन वेगवेगळ्या भागांत पाहायला मिळाला. सकाळी ११ वाजता सिरजगाव फाटा येथे संजरपूर, मालुंजा, उत्तरवाडी, भालगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता मुद्देशवाडगाव फाटा येथे मांजरी, शिंगी, पिंपरी, वरखेड, मुद्देशवाडगाव व वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला. शेवटी दुपारी २ वाजता भेंडाळा फाटा छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्ग या महत्त्वाच्या मार्गावर बोलेगाव, बाबरगाव, सय्यदपूर, बाळापूर व भेंडाळा परिसरातील शेतकरी एकवटले. नरहरी रांजणगाव फाटा येथेही आंदोलन करण्यात आले. चार ठिकाणी झालेल्या आंदोलनांमुळे एक तासाहून अधिक वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याप्रसंगी रब्बी हंगामासाठी कालव्याची तीन आवर्तने तातडीने सोडणे, उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्यासाठी तीन आवर्तने आरक्षित ठेवणे आणि पाण्याचे वितरण ‘टेल टू हेड’ या न्यायाने समान पद्धतीने करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. या वेळी जि. प. सदस्या वैजयंती वाल्मीक सिरसाठ, नारायण बाराहाते, अजयसिंग परदेशी, माणकचंद राजपूत, योगेश दंडे, दिनेश तोडमल यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या जनक्षोभाची दखल घेऊन पाणी सोडण्याबाबतचे आदेश दिले नाहीत तर यापेक्षाही तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. वैजापूर येथे कालवा कार्यालयासमोर शिंदे यांचे तीन दिवसांपासून उपोषण नांदूर मधमेश्वर कालव्यातून रब्बी हंगामासाठी आणि पिण्यासाठी पाणी सोडण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाने शुक्रवारी आक्रमक वळण घेतले. तालुक्यात सहा ठिकाणी रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली. दुसरीकडे कालवा कार्यालयासमोर पंडित शिंदे यांचे तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरूच आहे. या आंदोलनात आता लोकप्रतिनिधींनीही उडी घेतली असून आगामी बैठकीत पाण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर सर्वांच्या आधी स्वतः रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार रमेश बोरनारे यांनी दिला.
Source link
पंडितअण्णा शिंदे यांच्या उपोषणास पाठिंबा:नांदूर मधमेश्वरच्या पाण्यासाठी गंगापूरला ४, वैजापूर येथे सहा ठिकाणी रास्ता रोको