Headlines

कराळेंनी घेतलेली मते भाजपची नव्हती!:पण त्यांना एवढी मते कशी मिळाली याचे आत्मचिंतन करू; गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांचे मोठे वक्तव्य




“नागपूर पदवीधर मतदारसंघातील जागा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. त्या निवडणुकीत पराभव झाला हे वास्तव असून ते स्वीकारले पाहिजे. अपक्ष उमेदवार नीतेश कराळे यांनी घेतलेली मते ही निश्चितपणे भाजपची पारंपरिक मते नव्हती, तर भाजपला न मिळणारी मते त्यांना मिळाली. मात्र, तरीही कराळेंना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मते कशी मिळाली, याची दखल पक्षाने घेतली असून पराभवाच्या कारणांचे सखोल व गंभीर आत्मचिंतन केले जाईल. भविष्यात या चुका दुरुस्त करूनच पक्ष पुढील निवडणुकांना सामोरा जाईल,” अशी रोखठोक कबुली राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नागपूर येथे दिली. नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना पंकज भोयर यांनी विधानपरिषद निवडणुकीतील अपयश, 2 नोव्हेंबर रोजी होणारी भाजपची महत्त्वाची बैठक, पुण्यातील राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणातील तपास, परीट-धोबी समाजाचे आरक्षण आंदोलन, कंत्राटदारांची थकीत बिले आणि महायुतीतील नेत्यांच्या वक्तव्यांवर सविस्तर भूमिका मांडली. कराळेंना मिळालेली मते भाजपची नव्हती नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभवाच्या कारणांवर बोलताना गृह राज्यमंत्री म्हणाले, “नागपूर पदवीधर मतदारसंघात सर्वच नेते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते, तरीही यश आले नाही. आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात काहीही अर्थ नाही. निवडणुकीत अपयश आले ही वस्तुस्थिती स्वीकारून पक्ष आत्मपरीक्षण करत आहे. वर्धा आणि नागपूर परिसरात नीतेश कराळे यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे मोठे नुकसान झाल्याची चर्चा आहे. मात्र कराळेंनी घेतलेली मते भाजपची नव्हती. तरीही त्यांना एवढी मते कशी मिळाली, यावर पक्ष गांभीर्याने विचार करत आहे.” 2 नोव्हेंबरला नागपुरात मंथन “भाजप प्रदेशाध्यक्ष आणि संघटन मंत्र्यांचे संपूर्ण राज्यभरात विभागनिहाय दौरे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर २ नोव्हेंबर रोजी नागपुरात पराभवाचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे.” राणा सूर्यवंशी प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी पुण्यातील राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ला आणि रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केलेल्या संशयावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. “राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची पहिली तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानंतर हा हल्ला बनावट असल्याच्या तक्रारीही दाखल झाल्या. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.” महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांत उत्तम समन्वय; भावनांच्या भरात बोलणे टाळावे भाजप आणि शिंदे सेनेमध्ये गेल्या काही दिवसांत रंगलेल्या शाब्दिक वादावर त्यांनी सावध भूमिका मांडली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात उत्तम आणि मजबूत समन्वय आहे. स्थानिक पातळीवर काही नेते अनेकदा भावनांच्या भरात जाऊन आक्रमक विधाने करतात. मात्र, महायुती भक्कम असून अंतर्गत वादाचा फायदा विरोधकांना होऊ नये यासाठी नेत्यांनी सार्वजनिक विधाने करताना काळजी घेणे आवश्यक आहे.” परीट समाजाला सवलती, कंत्राटदारांची बिले आणि फटाक्यांवर न्यायालयाचे निर्देश नागपुरातील इतर स्थानिक आणि प्रशासकीय मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले. “परीट समाजाला अनुसूचित जातीत (SC) समाविष्ट करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने आधीच केंद्राकडे पाठवली आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींचा शासन निर्णय (GR) तातडीने जारी व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला जाईल.” कंत्राटदारांची थकीत बिले “राज्यात शेतकरी कर्जमुक्ती आणि लाडकी बहीण योजनेसारख्या मोठ्या सामाजिक योजना राबवल्यामुळे काही प्रकल्पांतील कंत्राटदारांची बिले प्रलंबित राहिली आहेत. शासनाने या विषयाची गंभीर दखल घेतली असून कंत्राटदारांच्या मागण्यांवर लवकरच मार्ग काढला जाईल.” 55 डेसिबल फटाके मर्यादा “उच्च न्यायालयाने 55 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.” सिंधी रेल्वे येथे ड्रायपोर्ट आणि लॉजिस्टिक पार्कचे लोकार्पण विदर्भाच्या विकासाचा उल्लेख करताना गृह राज्यमंत्री म्हणाले, “सिंधी रेल्वे परिसरात ड्रायपोर्ट आणि मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. या महत्त्वाकांक्षी लॉजिस्टिक पार्कचे लोकार्पण होत असून, या प्रकल्पामुळे विदर्भातील स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ————————————————————– हेही वाचा… देवेंद्रजींवर बोलताना लायकीत राहा; धंगेकरांना बन यांचा इशारा: म्हणाले- कालपर्यंत व्हिलन वाटणारा विजय मल्ल्या राऊतांना आज महात्मा कसा वाटू लागला? “पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात जेव्हा तपास यंत्रणांनी अटक केली होती, तेव्हा ‘मी काय विजय मल्ल्या आहे का?’ असा सवाल विचारणारे संजय राऊत आज आपल्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकातून त्याच विजय मल्ल्याला थेट महात्मा ठरवण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत. बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्या मल्ल्यामध्ये आणि मुंबईतील पत्राचाळीत मराठी माणसाची घरे बुडवणाऱ्या संजय राऊतांमध्ये काहीही फरक नाही, दोघांचेही कॅरेक्टर एकच आहे. कालपर्यंत पवार साहेबांची आणि राहुल गांधींची वकिली करणारे राऊत आता विजय मल्ल्यांची वकिली करत आहेत; यासाठी त्यांनी नेमकी कोणती डील केली आहे? या पुस्तकाचे नाव ‘बोध कीर्तन’ ठेवण्यापेक्षा ‘बाळबोध नर्तन’ ठेवले असते तर ते अधिक शोभून दिसले असते,” असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *