![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या पत्रकारितेतील प्रवासाच्या आठवणी सांगितल्या. तसेच मराठी भाषा, वाचनसंस्कृती, विचारशक्ती आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही आपली भूमिका मांडली. भाषणादरम्यान त्यांनी काही जणांचे फोन 2019 नंतर बंद झाल्याचा उल्लेख केला. “काही जणांचा फोन 2019 पासून थांबला, तो थांबलाच. तो फोन काही त्यांनी होणार नाही,” असे म्हणत त्यांनी राजकीय संदर्भातून टोला लगावला. संजय राऊत यांच्या पत्रकारितेचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील काही आठवणी सांगितल्या. ‘सामना’मध्ये एखादी बातमी दोनदा छापली गेली किंवा हेडिंगमध्ये काही चूक झाली, तर सकाळी चहा घेत असताना इंटरकॉम वाजायचा. तो इंटरकॉम म्हणजे साहेबांचाच असणार, हे त्यांना माहीत असायचे. इंटरकॉम वाजला की ‘सामना’मध्ये काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात यायचे, असे त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेबांचा राग आधी आपल्यावर निघायचा. त्यानंतर संजय राऊत यांना फोन करून त्यांच्याशी बोलण्यास सांगितले जायचे. काही वेळाने संजय राऊत यांचा फोन यायचा आणि प्रकरण शांत व्हायचे. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा काहीतरी घडायचे आणि आपल्याला पुन्हा ऐकावे लागायचे, अशी मिश्किल आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. ‘घोषणा आणि घुसवणं यात फरक’; संजय राऊत यांच्या लेखणीचे केले कौतुक संजय राऊत यांच्या लेखनशैलीचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, घोषणा करणे आणि एखाद्याच्या अंतरंगात शिरून त्याला समजून घेणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संजय राऊत यांना या दोन्ही गोष्टी चांगल्या जमतात. ते एखाद्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरतात आणि त्यानंतर आपल्या लेखणीतून त्या व्यक्तीच्या मनातही घुसतात. त्यामुळे त्यांच्या लेखणीतून कधी काळजात घुसणारे शब्द बाहेर पडतात, तर कधी ओव्यांसारखे सुंदर शब्द उमटतात. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका विधानाची आठवण करून दिली. अक्षरांचे शब्द होतात, शब्दांच्या ओव्या होतात आणि शब्दांच्या शिव्याही होतात. या दोन्ही शब्दांचे सामर्थ्य संजय राऊत यांच्याकडे आहे. कोणाला ओव्या ऐकवायच्या आणि कोणाला शिव्या द्यायच्या, हे त्यांना चांगले माहीत आहे, असे ठाकरे म्हणाले. मोबाईलच्या वाढत्या वापरावर चिंता; विचारशक्ती म्युझियममध्ये जाण्याची भीती संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ पुस्तकातील लिखाणाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी बदलत्या वाचनसंस्कृतीवरही भाष्य केले. आजच्या पिढीला मोबाईलवर वेगाने टायपिंग करता येते; मात्र हाताने लिहिण्याची सवय कमी होत आहे. भविष्यात अक्षर आणि पेन या गोष्टी म्युझियममध्ये ठेवाव्या लागतील की काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. आज कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी चॅटजीपीटीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मात्र, त्यातून मिळणारी काही उत्तरे पाहून आपणही चकित होतो, असे ते म्हणाले. मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसांची विचार करण्याची क्षमता कमी होत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. “शब्द म्युझियममध्ये जातील, त्याप्रमाणे आपली विचारशक्ती सुद्धा म्युझियममध्ये जाईल. कारण विचार करायला वेळ आहे कुठे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण आणि राज ठाकरे खूप वाचतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात वाचण्यापेक्षा अनेक गोष्टी वाचवण्यातच अधिक वेळ जातो, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. मराठीचा आग्रह धरायचा असेल तर शुद्ध मराठीही आली पाहिजे मराठी भाषेच्या महत्त्वावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी केवळ मराठी भाषेचा आग्रह धरणे पुरेसे नसून, ती भाषा योग्य पद्धतीने बोलता आणि लिहिता आली पाहिजे, असे मत व्यक्त केले. मराठी भाषेतील शब्दांचे सामर्थ्य आणि त्यातील गमतीजमती आपण विसरत चाललो आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या लेखनातील काही विनोदी उदाहरणांचा उल्लेख केला. इंग्रजीतील ‘नर्व्हस सिस्टीम’ला मराठीत ‘मज्जासंस्था’ म्हणतात, या शब्दखेळाचा दाखला देत त्यांनी भाषेतील गंमत उलगडून सांगितली. तसेच पु. ल. देशपांडे यांनी रेडिओवरील श्रुतिकांच्या माध्यमातून शब्दांची अदलाबदल करून निर्माण होणाऱ्या विनोदाचे उदाहरण दिल्याची आठवणही त्यांनी सांगितली. जात्यावरच्या ओव्या हरवल्या, जातिवाचक शिव्या मात्र राहिल्या पूर्वी महिलांकडून जात्यावर दळण दळताना ओव्या गायल्या जायच्या. त्या ओव्यांमधून जीवनाचे अनुभव, विचार आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत होती. मात्र, काळानुसार जात्यावर दळण्याची पद्धत संपली आणि त्यासोबत ओव्याही हरवल्या. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आता जाती गेल्या, जात राहिली, ओव्या गेल्या आणि जातिवाचक शिव्या राहिल्या.” या विधानातून त्यांनी समाजातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले. रोजच्या आंदोलनांमध्ये माणसांची विचार करण्याची शक्ती कमी होतेय सध्याच्या सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नांचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांनी आंदोलने आणि संघर्षांच्या माध्यमातून सतत लोकांना वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये गुंतवून ठेवले जात असल्याचे सांगितले. कुठे वीज प्रकल्पासाठी झाडांची तोड होते, कुठे नवीन प्रकल्प उभारले जातात, तर कुठे अन्यायाच्या घटना घडतात. प्रत्येक वेळी लोकांना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागते. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरील अदानी समूहाच्या प्रस्तावित 2,100 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचा उल्लेख केला. अशा प्रश्नांमुळे लोकांना सतत संघर्ष करावा लागतो आणि वाचन, चिंतन व विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही, असे ते म्हणाले. “रोज काही ना काहीतरी तुमच्यावर आदळून टाकायचं, की आपली विचारशक्ती मरत चाललेली आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे केले कौतुक; संजय राऊत यांना शुभेच्छा संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या पुस्तकाला अनुक्रमणिका नाही. त्यामुळे वाचक कोणतेही पान उघडून वाचू शकतात. एखाद्या पानावर केवळ चार ओळी असल्या, तरी त्या चार ओळींमध्ये एका पुस्तकाएवढा अर्थ दडलेला आहे. पुस्तकातील विचार आयुष्यात उपयोगी पडणारे आहेत. कधी लढायचे आणि कधी थांबायचे, याचा बोध या पुस्तकातून मिळतो, असेही त्यांनी सांगितले. संजय राऊत यांनी तुरुंगवासाच्या काळात आलेल्या अनुभवांतून हे पुस्तक लिहिले आहे. तुरुंगवास हा विपश्यनेसारखा ठरवून त्यातून चिंतन, मनन आणि लेखन करणारे संजय राऊत हे वेगळे व्यक्तिमत्त्व असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तुरुंगातील कठीण परिस्थितीतही स्वर्ग शोधण्याची क्षमता संजय राऊत यांच्यात असल्याचे सांगत त्यांनी त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी अंबरीश मिश्र यांच्यासारखे व्यासंगी, ज्ञानी आणि अनुभवाच्या जोरावर अधिकारवाणीने बोलणारे पत्रकार कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानत त्यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाचे पुन्हा एकदा कौतुक केले. हेही वाचा…. राज ठाकरेंकडून संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे कौतुक:म्हणाले, ‘बोधनकरांपासून सुरू झालेला प्रवास बोध कीर्तनापर्यंत येईल, असं वाटलं नव्हतं’ शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (31 ऑक्टोबर) सायंकाळी दादर येथील शिवसेना भवनासमोरील ब्राह्मण सहाय्यक संघ येथे पार पडत आहे. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ज्येष्ठ पत्रकार अमरीश मिश्र यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या लेखनशैलीचे, पुस्तकातील आशयाचे आणि त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाचे कौतुक केले. तसेच संजय राऊत यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. सविस्तर वाचा….
Source link
2019 नंतर काही जणांचे फोन थांबले, आजही सुरू नाहीत:संजय राऊतांच्या 'बोध कीर्तन' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंचा टोला