![]()
पुण्यातील ठेवीदारांची १ कोटी ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ‘कुबेर शक्ती मल्टीपर्पज इंडिया निधी लिमिटेड’चा संचालक शिरीष उर्फ ओम ज्ञानदेव खरात याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पाच वर्षे दहा महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात असूनही खटल्यात आरोप निश्चित झाले नव्हते. याची दखल घेत न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांच्या एकलपीठासमोर खरातच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. बचाव पक्षातर्फे अॅड. नीलेश वाघमोडे आणि अॅड. चैतन्य मुळावकर यांनी बाजू मांडली. कंपनीची स्थापना आणि ठेवी स्वीकारल्यानंतर खरात व सहआरोपी क्रमांक दोन यांच्यात कंपनीचे समभाग आणि मिळालेल्या रकमेबाबत करार झाला होता, असा बचाव पक्षाचा दावा होता. त्यानुसार खरातने स्वतःकडील ६७ टक्के समभाग सहआरोपीकडे हस्तांतरित केले. या हस्तांतरणानंतर तीन महिन्यांनी ठेवीदारांना परतावा न मिळाल्याने तक्रार दाखल झाली, असेही बचाव पक्षाने सांगितले. खरात पाच वर्षे दहा महिन्यांपासून तुरुंगात आहे आणि अद्याप आरोप निश्चित झालेले नाहीत. खटल्याला झालेला विलंब लक्षात घेऊन त्याला जामीन द्यावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली. सरकारी वकिलांनी जामिनाला विरोध केला. खरातविरुद्ध यापूर्वीही एमपीआयडी कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्याकडून पुन्हा ठेवीदारांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवादही केला. आठ लाख रुपयांच्या ठेवीवर ४० लाख रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने खटल्याला झालेल्या विलंबाबाबत सरकारी पक्षाकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याचे नमूद केले. खरातचा गुन्ह्यातील सहभाग खटल्याच्या सुनावणीत सिद्ध होईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्याला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि एक किंवा दोन हमीदारांच्या अटीवर जामीन मंजूर केला.
Source link
कुबेर शक्तीच्या संचालकाला जामीन मंजूर:ठेवीदारांची 1.47 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप; पाच वर्षे दहा महिने तुरुंगात, खटल्याला विलंब