![]()
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नागरिक वाढत्या उकाड्याने आणि कडक उन्हाने हैराण झाले होते. मात्र, राज्यात अचानक हवामानात बदल झाला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी संध्याकाळपासून पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी आगामी काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, अहिल्यानगर आणि साताऱ्यात पावसाचा फटका रविवारी संध्याकाळपासून पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली. हिंजवडी, कर्वे रोड, चांदणी चौक, बालेवाडी आणि मुळशी परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पुणे-नाशिक महामार्ग, तसेच चाकण चौक आणि तळेगाव मार्गावर पाणी साचले होते. हिंजवडीत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती, ज्यामुळे दुचाकीस्वार आणि चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. सोमवारी (२ नोव्हेंबर) पहाटे पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी, सकाळच्या सत्रात पुण्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. सातारा शहर व ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यांवरून पाणी वाहू लागले होते. याशिवाय, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका, निमगाव बोडखा आणि कडा परिसरात रविवारी दुपारच्या आणि सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. पुढील हवामानाचा अंदाज आणि ‘यलो अलर्ट पुणेकरांसाठी आज कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांनी आणि विशेषतः वाहनचालकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ———————– हेही वाचा… चक्रीवादळ ‘मुरासु’ चेन्नईपासून 260km दूर: रात्री आंध्र किनारपट्टीला धडकणार, एमपीसह 8 राज्यांत वादळ-पाऊस; यूपीच्या 10 शहरांत धुके
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मुरासू’ (Murasu) चक्रीवादळ आता अधिक तीव्र झाले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास हे वादळ चेन्नईपासून २६० किमी आणि नेल्लोरपासून २९० किमी अंतरावर होते. हे वादळ ताशी २० किमी वेगाने पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ २ नोव्हेंबर रोजी रात्री किंवा ३ नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ओंगोलजवळ धडकण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमीपर्यंत पोहोचू शकतो. या चक्रीवादळाचा फटका छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या आठ राज्यांना बसण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा
Source link
राज्यात अवकाळीचा तडाखा!:पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीडसह अनेक जिल्ह्यांत पाऊस; कोकण अन् पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट