Headlines

मुंबईत लग्नाच्या जेवणातून विषबाधा!:नवरदेव-नवरीसह 27 जणांची प्रकृती बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात केले दाखल




लग्नघरातील आनंदाच्या वातावरणात अचानक भीती आणि गोंधळ उडवणारी एक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील भांडुप परिसरात एका लग्नसोहळ्यात जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत नुकतेच लग्नबंधनात अडकलेल्या नवविवाहित जोडप्यासह तब्बल २७ जणांची प्रकृती बिघडली असून, सर्वांना मध्यरात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. जेवणानंतर अचानक सुरू झाला त्रास मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप परिसरात एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रात्रीच्या वेळी लग्नाचे जेवण झाल्यानंतर अनेक पाहुण्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच अनेकांना उलट्या, जुलाब आणि अपचनाचा प्रचंड त्रास सुरू झाला. एकाच वेळी अनेक पाहुण्यांची आणि खुद्द नवरदेव-नवरीची प्रकृती बिघडल्याने लग्नघरात एकच खळबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रात्री ११:४० च्या सुमारास या सर्वांना उपचारासाठी तातडीने जवळच्या एमटी अग्रवाल म्युनिसिपल जनरल रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी काय माहिती दिली? या घटनेबाबत माहिती देताना एमटी अग्रवाल म्युनिसिपल जनरल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलाश मारस्कोले यांनी सांगितले की, “आमच्या रुग्णालयात विषबाधा झालेल्या एकूण २७ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने २ लहान मुले, ११ महिला आणि ९ पुरुषांचा समावेश आहे. एका लग्न समारंभात जेवण केल्यानंतर त्यांना अपचनाचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर त्यांना उलट्या व जुलाबाची तक्रार जाणवू लागली. रात्री ११:४० वाजता ते सर्वजण येथे पोहोचले. त्यांच्यावर तत्काळ प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले असून, सध्या सर्व २७ रुग्णांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे, धोक्याचे कोणतेही कारण नाही.” वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी, या विषबाधेमुळे लग्नसोहळ्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अन्नातून विषबाधा नेमकी कशामुळे झाली, जेवणात कोणता पदार्थ खराब होता, याचा अधिक तपास आता संबंधित यंत्रणांकडून केला जाण्याची शक्यता आहे. —————— हेही वाचा.. राज्यात अवकाळीचा तडाखा!: पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीडसह अनेक जिल्ह्यांत पाऊस; कोकण अन् पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नागरिक वाढत्या उकाड्याने आणि कडक उन्हाने हैराण झाले होते. मात्र, राज्यात अचानक हवामानात बदल झाला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी संध्याकाळपासून पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी आगामी काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *