Headlines

बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर 18 मे पासून:समता सैनिक दलाचे शिबिरही; भारतीय बौद्ध महासभेचे आयोजन




भारतीय बौद्ध महासभेच्या बडनेरा आणि नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या वतीने बडनेरा व दाभा येथे बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर आणि समता सैनिक दल शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे १८ ते २७ मे २०२६ या कालावधीत होतील. बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराचे आयोजन कपिल मंडळ बुद्ध विहार, अशोक नगर, बडनेरा येथे करण्यात आले आहे. या शिबिरात सुमारे ४० ते ५० श्रामनेर सहभागी होणार असून, त्यांच्या निवास आणि दैनंदिन गरजांची व्यवस्था केली जाईल. शिबिरादरम्यान दररोज चार विषयांवर मार्गदर्शन होणार असल्याने १० दिवसांत एकूण ४० विषयांवर सखोल शिक्षण दिले जाईल. या शिबिरात पूज्य भंते शाक्यपुत्र राहुल (राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा व संस्थापक अध्यक्ष, जेतवन धम्म संस्कार केंद्र, अकोला), पूज्य भंते नागसेन आणि इतर भंतेगण यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच केंद्रीय शिक्षक युवराज मोरे (नांदेड) यांचीही उपस्थिती राहणार असून, ते शिबिरार्थींना प्रशिक्षण देतील. याच अनुषंगाने समता सैनिक दलाचे दोन दिवसीय शिबिर दिनांक १६ व १७ मे २०२६ रोजी बडनेरा व दाभा (तालुका नांदगाव खंडेश्वर) येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात इच्छुक युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक उपस्थित राहतील. समता सैनिक दलात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळी १० वाजता शिबिरस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दोन्ही शिबिरांचा एकत्रित समारोप आणि धम्म मेळावा त्यागमूर्ती आई रमाई यांच्या स्मृतिदिनी, बुधवार, २७ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता कपिल बुद्ध विहार परिसर, अशोक नगर, बडनेरा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला पूज्य भंतेगण, केंद्रीय शिक्षक तसेच एम. डी. सरोदे (केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख, प्रख्यात वक्ते, कवी व लेखक) प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. संस्कारमय समाज निर्मितीसाठी आयोजित या शिबिरांमध्ये अधिकाधिक शिबिरार्थींनी सहभागी व्हावे आणि संबंधित पदाधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बोरकर यांनी केले आहे. शिबिरादरम्यान श्रामनेर संघासाठी सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचे भोजन व सायंकाळी फलाहाराची व्यवस्था दानदात्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. नागरिकांनी किमान एक दिवस भोजनदान करून या धम्मकार्याला हातभार लावावा, असे आवाहन राज्य संघटक विजयकुमार चौरपगार यांनी केले आहे. तसेच भोजनदान देताना श्रामनेर व सेवकांसह संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *