![]()
अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद-नरसिंगपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव २३ एप्रिलपासून सुरू झाला आहे. वंदनीय राष्ट्रसंत जन्मोत्सव समिती आणि परिसरातील ग्रामस्थांच्या सहभागातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थानी असलेल्या स्मृती मंदिरात हा जन्मोत्सव साजरा होत आहे. यामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाल संस्कार शिबिर, दिंडी स्पर्धा, महिला मेळावा, रामधून आणि राष्ट्रसंत जन्मावतरण सोहळा हे प्रमुख कार्यक्रम आहेत. ग्राम जयंती महोत्सवाचा प्रारंभ रामचंद्र दादा कांडलकर यांच्या हस्ते ‘श्री’च्या महाअभिषेक पूजनाने झाला. दिव्यांगी कांडलकर आणि तिलक कांडलकर यांच्या हस्ते तीर्थस्थापना करण्यात आली. २९ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ५.३० ते ६ या वेळेत सामूहिक ध्यान व चिंतन, ६ ते ६.३० रामधून व भाषण, तर सकाळी ८ वाजता श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबिर आयोजित केले आहे. दुपारी ३ वाजता ह. भ. प. सुनील महाराज लांजुळकर यांचे संगीत ग्रामगीता प्रवचन होते. सायंकाळी ७ वाजता सामुदायिक प्रार्थना व प्रबोधन, तर रात्री ९ वाजल्यापासून विविध कीर्तनाचे कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये ह. भ. प. विवेक महाराज कुरूमकर, ह. भ. प. कु. कृष्णाई लांजुळकर, ह. भ. प. गणेश महाराज चांदेकर, ह. भ. प. कु. क्रांतीताई काळे, ह. भ. प. तेजस्विनीताई पाठक आणि ह. भ. प. प्रशांत महाराज ठाकरे यांचा समावेश आहे. मंगळवार, २८ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ८ या वेळेत रामधून आणि जन्मस्थान मोक्षधाम बाग (स्मशानभूमी यावली) येथे मूर्तींचे पूजन करण्यात येणार आहे. जागृती महिला मंडळ, यावली शहीद यांच्या वतीने दुपारी ३ वाजता महिला मेळावा आणि माहेरवासिनींचे मनोगत कार्यक्रम होईल. २९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम होईल. महोत्सवाचा विशेष कार्यक्रम मंगळवार, ३० एप्रिल रोजी पार पडेल. पहाटे ४ ते ६ या वेळेत राष्ट्रसंत जन्मावतरण व पुष्पांजली सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा जन्मावतरण सोहळा गोपाल सालोडकर व संच गुरुगुंज, संयोजक डॉ. देवेंद्र यादव गुरुकुंज आणि संचालन श्रीकृष्ण पखाले अमरावती हे सादर करतील. त्यानंतर सकाळी ६ वाजता सामूहिक ध्यान, ६.३० वाजता ग्राम प्रदक्षिणा व स्पर्धात्मक पालखी दिंडी सोहळा होईल. सकाळी १०.३० वाजता ह. भ. प. लक्ष्मणदास काळे महाराज यांचे गोपालकाल्याचे कीर्तन, दुपारी १२.३० वाजता सत्कार समारंभ आणि दुपारी १ ते ३ या वेळेत परमपूज्य श्री संत जयश्रीराम कांडलकर महाराज यांच्या स्मृत्यर्थ रामचंद्र दादा कांडलकर यांच्या सौजन्याने महाप्रसादाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती आयोजन समितीने दिली आहे.
Source link
यावली शहीद येथे राष्ट्रसंत जन्मोत्सव सुरू:23 एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन, 30 ला जन्मावतरण सोहळा