Headlines

‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंचला मानाचा ‘चेंज मेकर’ पुरस्कार:सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या लढ्याची दखल




सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि पर्यावरणपूरक परिवहन व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ या विविध संस्थांच्या मंचला मानाचा ‘चेंज मेकर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘मुव्ह इन सिंक’च्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार बंगळुरू येथे आयोजित ‘मोबिलिटी सिम्पोसियम 2026’मध्ये प्रदान करण्यात आला. मंचच्या वतीने समन्वयक रूपेश कलंत्री यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सार्वजनिक वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात परिणामकारक काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या योगदानाची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली. या सोहळ्यात बोईंग, व्हिसा, जेनपॅक्ट, बायोकॉन, मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉन यांसारख्या नामांकित कंपन्यांचाही गौरव करण्यात आला. फुटपाथच्या समस्या, दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधांची उपलब्धता, वाहतूक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर तसेच कर्मचाऱ्यांना मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे, अशा विविध उपक्रमांतून समाजाचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी काम करणाऱ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. ‘डबल द बस’ अभियानातून सार्वजनिक वाहतुकीसाठी लढा ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, बससेवेची क्षमता वाढावी आणि नागरिकांना खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी ‘डबल द बस’ हे अभियान राबवत आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम झाल्यास वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. याच उद्देशाने मंचने शहराला अपेक्षित असलेल्या एसी इलेक्ट्रिक बसचा प्रश्न सातत्याने लावून धरला. शहराला 2023 मध्येच 135 एसी इलेक्ट्रिक बस मिळणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित कंपनीकडून वारंवार पुढील तारखा दिल्या जात होत्या. त्यामुळे बससेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंचने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. यासाठी पत्रव्यवहार, चर्चा, स्मरणपत्रे, माहिती अधिकारांतर्गत अर्ज, प्रथम अपील, सुनावणी आणि आंदोलने अशा विविध मार्गांचा अवलंब करण्यात आला. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बसचा प्रश्न चर्चेत आला. वर्षभराच्या प्रयत्नांनंतर शहराला 61 बस मिळाल्या. सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांचे हे महत्त्वाचे फलित असल्याचे मंचच्या वतीने सांगण्यात आले. प्रसारमाध्यमांच्या भूमिकेचेही कौतुक पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना रूपेश कलंत्री यांनी या लढ्यात प्रसारमाध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहरासाठी पर्याय नसून गरज आहे, हा मुद्दा वृत्तपत्रांनी सातत्याने मांडला. त्यामुळे बससेवेचा प्रश्न नागरिकांपर्यंत पोहोचण्यास आणि त्यावर चर्चा होण्यास मदत झाली, असे त्यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी महापौर समीर राजूरकर आणि महापालिका आयुक्त अमोल येडगे यांचेही अभिनंदन केले. प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे काम केल्यास शहरातील वाहतूकविषयक समस्या सोडविण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मिळालेल्या 61 बस तातडीने सुरू करण्याची मागणी शहराला 135 एसी इलेक्ट्रिक बस मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 61 बस उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध बस कोणतेही कारण न देता तातडीने सेवेत सुरू कराव्यात, अशी मागणी ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंचने पुन्हा एकदा केली आहे. केवळ बस उपलब्ध होणे पुरेसे नसून त्यांचा प्रत्यक्ष सार्वजनिक वाहतुकीसाठी वापर सुरू होणे महत्त्वाचे आहे, अशी मंचची भूमिका आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आणि नागरिकांना सुरक्षित, सुलभ व सक्षम सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरजही मंचने व्यक्त केली. सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणारी व्यवस्था निर्माण झाल्यास शहराच्या पर्यावरणाच्या संरक्षणासोबतच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी होऊ शकतात. 13 संस्थांचा मंचच्या उपक्रमांत सहभाग ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ हा विविध सामाजिक संस्था आणि गटांना एकत्र आणणारा मंच असून, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित विविध उपक्रमांत सहभागी संस्था योगदान देतात. या मंचच्या विविध उपक्रमांत औदुंबर फाऊंडेशन (कला कट्टा), इकोग्रीन फाऊंडेशन, क्रेझी फ्रेंड्स, हॅप्पी हेल्दी ग्रुप, दीपशिखा फाऊंडेशन, प्लॉगर्स ग्रुप, क्रीडा संकुल मित्रमंडळ, बेस्ट फाऊंडेशन, जनसहयोग प्रतिष्ठान, गरवारे कम्युनिटी सेंटर, प्रयास युथ क्लब, रीड ॲंड लीड फाऊंडेशन आणि संडे क्लब या 13 संस्थांचा सहभाग आहे. विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून सार्वजनिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे आणि प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करून घेण्यासाठी पाठपुरावा करणे, हे मंचच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. ‘चेंज मेकर’ पुरस्कारामुळे या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, शहराला अधिक पर्यावरणपूरक, कोंडीमुक्त आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळावी, यासाठी पुढील काळातही प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार मंचने व्यक्त केला आहे. हेही वाचा… ‘तिन्ही पक्ष सहा महिने भांडले आणि आता गळ्यात गळे घातले’:सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल; शिट्टीला विजयी करण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. आज काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चूयेकर यांच्या करवीर तालुक्यातील चूये गावातील स्मारकाला अभिवादन करून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *