![]()
लघुपट निर्मितीचा एकूणच वेग मंदावल्याचे चित्र असताना, या महोत्सवाला मिळालेला उत्साही प्रतिसाद उमेद वाढविणारा आहे आणि लघुपट निर्मितीसाठी आशादायी चित्र यामुळे निर्माण होईल, असे प्रतिपादन फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे कुलगुरू धीरज सिंह यांनी व्यक्त केले. मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी महोत्सवाचे आयोजक जय भोसले, संचालक वीरेंद्र चित्राव, व्यवस्थापकीय संचालक अभिषेक अवचार, दिग्दर्शक निर्माते केदार शिंदे, फिल्ममेकर मार्क बेनीटन, फिल्ममेकर समीर सोनी, शिल्पा शिरोडकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यंदाच्या मुंबा चित्रपट महोत्सवाला केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांचा थेट सहभाग असल्याने महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी मिळाली. महोत्सवाचा समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी धीरजसिंग यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकप्राप्त लघुपट व चित्रपटांचा सन्मान करण्यात आला. धीरजसिंह म्हणाले, लघुपट, माहितीपटांसह चित्रपटांचा महोत्सव आयोजित करणे, हे आव्हानात्मक काम आहे. एक मोठी आणि समर्पित वृत्तीची टीम त्यासाठी लागते. मुंबाने हे आव्हान पेलले, यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. केदार शिंदे म्हणाले, मी पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता आहे. तरीही मला लघुपट, माहितीपटांचे आधिक्य असलेल्या उपक्रमात आमंत्रित केले, याविषयी कृतज्ञता वाटते. असे महोत्सव नव्या, उदयोन्मुख फिल्ममेकर्सना व्यासपीठ देतात, म्हणून ते महत्त्वाचे आहेत. शिवाय या महोत्सवाच्या आयोजनात सातत्य आहे, हेही महत्त्वाचे आहे. मला या क्षेत्रात अद्याप एकही पुरस्कार कुणी दिला नाही, तरी मी २२ वर्षे या क्षेत्रात पाय रोवून उभा आहे, हे पुरेसे बोलके आहे, असेही ते म्हणाले. ‘हलगी’ लघुपटाने, ‘मलावाझी’ चित्रपटाने मारली बाजी मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट, लघुपट महोत्सवात ‘हलगी’ या लघुपटाने तर ‘मलावाझी’ या मल्याळम चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावत बाजी मारली. ‘आभाळवृक्ष’ हा सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट ठरला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपटाचा मान ‘किकिंग टोवर्ड टुमारो’ या लघुपटाने तर सर्वोत्कृष्ट दक्षिण भारतीय लघुपट म्हणून ‘रेनबोज इन मोनोक्रोम’ला पुरस्कार देण्यात आला. याशिवाय चित्रपट विभागात रिव्हर टेल्स (द्वितीय क्रमांक), बाब (तृतीय क्रमांक) यांना पुरस्कार मिळाले. लघुपट श्रेणीत व्हेअर इज उर्मिला (द्वितीय पुरस्कार) तर मिस्ट्री बोलर (तृतीय पुरस्कार) उल्लेखनीय ठरले. ‘बोल बोल राणी’ हा उत्तम सामाजिक संदेश देणारा लघुपट ठरला. दिग्दर्शकाची दूरदृष्टी मांडणारा लघुपट म्हणून ‘ऑम्लेट’ला गौरविण्यात आले.
Source link
मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'हलगी' आणि 'मलावाझी'ने मारली बाजी:लघुपट निर्मितीसाठी आशादायी चित्र; एफटीआयआयचे कुलगुरू धीरजसिंह उपस्थित