Headlines

एआय युगात मानवी विवेक आवश्यक:एमआयटी-एडीटी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेत कुलगुरू प्रा. डॉ. एन. नागराजू यांचे प्रतिपादन




कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात माहिती मिळविणे आणि उत्तरे तयार करणे सोपे झाले असले, तरी सत्य-असत्यातील फरक ओळखणे, चिकित्सक विचार करणे आणि नैतिक निर्णय घेणे यासाठी मानवी विवेकाची आवश्यकता कायम राहणार आहे. त्यामुळे भविष्यातील विद्यापीठांनी तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचारक्षमता, नैतिक जाणीव आणि मानवी मूल्ये विकसित करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. नागराजू यांनी केले. भारतीय इंग्रजी भाषा शिक्षक संघटना आणि एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या आंतरराष्ट्रीय आणि ५६ व्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ब्रिटिश कौन्सिलचे उपसंचालक शॅनन वेस्ट, पद्मश्री गिरीश प्रभुणे, केंब्रिज विद्यापीठाचे दक्षिण आशिया संचालक टी. के. अरुणाचलम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. एआयचा वापर केवळ तंत्रज्ञानापुरता मर्यादित न ठेवता सर्व विद्याशाखांमध्ये एआय साक्षरता विकसित करणे आवश्यक आहे. माहितीचे विश्लेषण आणि लेखनासाठी एआय उपयुक्त असले, तरी वास्तव आणि आभास यांतील फरक समजून घेणे तसेच योग्य-अयोग्याचा निर्णय घेणे या मानवी क्षमतांना ते पर्याय ठरू शकत नाही, असे नागराजू यांनी स्पष्ट केले. अनिश्चिततेच्या काळात संयमाने विचार करून निर्णय घेण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी आयोजित वाचन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. कोणत्याही भाषेत प्रभुत्व मिळविण्यासाठी त्या भाषेतील साहित्याचे नियमित वाचन आवश्यक आहे. वाचनामुळे शब्दसंग्रह आणि बहुश्रुतता वाढते, तसेच विविध विषयांवर आत्मविश्वासाने मत मांडता येते. भाषेला विज्ञानाची आवश्यकता नसली, तरी विज्ञानाला भाषेची आवश्यकता नक्कीच भासते, असे ते म्हणाले. या परिषदेत देशभरातील सुमारे एक हजार इंग्रजी शिक्षक व प्रतिनिधी, तसेच विविध देशांतील ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्वान सहभागी झाले. संशोधन सादरीकरणांसह शिक्षण, भाषा आणि तंत्रज्ञानातील बदलांवर यावेळी चर्चा झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *