Headlines

पुणे शहरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू:शंकरशेठ, मंगळवार पेठ आणि कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडल्या घटना, गुन्हे दाखल




पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शंकरशेठ रस्ता, मंगळवार पेठ, तसेच कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या. शंकरशेठ रस्त्यावर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रिहान मुनीर खान (वय २०, रा. घोरपडे पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत रिहानचा मावसभाऊ इरफान रहीम शेख (वय ३८, रा. घाेरपडे पेठ) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रिहान हा १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास चिमणराव ढोले पाटील चौकातून (सेव्हन लव्हज चौक) स्वारगेटकडे निघाला होता. शंकरशेठ रस्त्यावर भरधाव डंपरने दुचाकीस्वार रिहानला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपर चालक पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिहानला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक एन वळसंग तपास करत आहेत. रिक्षाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार पेठेतील नरपरतगिरी चौक परिसरात घडली. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. इरफान शेख (वय ३६, रा. मेमजादे अपार्टमेंटशेजारी, भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत शेख यांचा भाऊ मोहसीन (वय ३३) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इरफान शेख हे नरपतगिरी चौक परिसरातील काळावाडा परिसरातून निघाले होते. पं. जवाहरलाल नेहरु रस्ता ओलांडत असताना भरधाव रिक्षाने इरफान यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस फौजदार काळेल तपास करत आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रथमेश प्रमोद कुंजीर (वय २१) असे मृ्त्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत अरुण चंद्रकांत बोरकर (वय ६१, रा. मांगडेवाडी, कात्रज) यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरकर यांच्या भाच्याचा मुलगा प्रथमेश हा दुचाकीवरुन कात्रज-कोंढवा रस्त्याने निघाला होता. कोंढव्यातील गोकुळनगर परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार प्रथमेश याला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या प्रथमेशचा मृत्यू झाला. पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक चाऊस तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *