![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आलेला फोन आणि प्रफुल पटेल यांनी घेतलेली भेट, यावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आमदार रोहित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. या भेटींमध्ये कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट करतानाच, आजारपणातील भेटीच्या फोटोंचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवार गटाला टोला लगावला. याचवेळी, पोलिस भरतीतील बोगस प्रमाणपत्र रॅकेट उघड करणाऱ्या वैभव चव्हाण या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूवरून रोहित पवारांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत, राज्यातील कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेल्याचा घणाघात केला. ‘मोदींचा फोन किंवा पटेलांच्या भेटीत राजकारण नाही’ शरद पवार रुग्णालयात असताना पंतप्रधान मोदींचा फोन आणि प्रफुल पटेल यांच्या भेटीबाबत विचारण्यात आले असता रोहित पवार म्हणाले, “पवार साहेब हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना जास्त स्ट्रेस न घेण्याचा आणि लोकांशी जास्त न बोलण्याचा सल्ला दिला आहे. पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत खालावलेली असताना पंतप्रधान मोदींसह अनेक नेते त्यांची विचारपूस करण्यासाठी फोन करतात. यामध्ये राजकीय काही दडलेले आहे, असे मला वाटत नाही.” ‘…पण फोटोंचा राजकारणासाठी वापर करू नये’ प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतर समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ यावर सूचक भाष्य करत रोहित पवार म्हणाले, “हॉस्पिटलमध्ये पवार साहेबांना काँग्रेसचे, आमच्या पक्षाचे, कुटुंबातले आणि विरोधी पक्षातले लोकही भेटले. एखादी व्यक्ती आजारी असताना दुसऱ्या पक्षातून कोणी भेटायला येत असेल, तर त्यामागे राजकारण नसते. पण, जर भेटणाऱ्या लोकांनी त्या फोटो आणि व्हिडिओचा वापर करून आपल्या पक्षांतर्गत राजकारणासाठी काही वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर ते योग्य नाही, ते अजिबात बरं नाही.” वैभव चव्हाणचा मृत्यू दुर्दैवी, आम्ही लढा पुढे नेऊ बीड आणि धाराशिव पोलीस भरतीमधील ‘बोगस प्रमाणपत्र रॅकेट’ उघडकीस आणणारा तरुण वैभव चव्हाण याच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रश्नावर रोहित पवार अत्यंत आक्रमक झाले. “वैभवने खूप महत्त्वाचा मुद्दा पुढे आणला होता. बोगस प्रमाणपत्रांचे एक मोठे रॅकेट राज्यात सुरू आहे. त्याचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही त्याच्या परिवारासोबत खंबीरपणे उभे आहोत. त्याचा जो लढा अर्धवट राहिला आहे, तो आता आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत,” अशी ग्वाही रोहित पवार यांनी दिली. ‘राज्यातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला’ राज्य सरकारच्या कारभारावर आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते म्हणाले, “सत्य बाहेर आणणाऱ्या आणि रॅकेट उघड करणाऱ्या तरुणांना जर असे मारले जात असेल, तर आपल्या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय तळागाळाला गेली आहे, हे आपण नक्कीच बोलू शकतो.” —————- हेही वाचा.. गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा डाव: फडणवीसांनी वडिलांच्या त्यागाचा अपमान केला, संजय राऊतांचा घणाघात; किरीट सोमय्या, मुश्रीफांनाही टोला
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावरील प्रशासकीय कारवाई आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांना ‘ईडी’कडून मिळालेली क्लीन चिट, या मुद्द्यांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. गोकुळ दूध संघ गुजरातच्या अमूलला विकण्याचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच, भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आता अटल सेतूवरून उडी मारावी, असा टोलाही त्यांनी लगावला. सविस्तर वाचा
Source link
शरद पवारांना मोदींचा फोन, पटेलांच्या भेटीत राजकारण नाही:पण फोटोंचा राजकारणासाठी वापर नको, रोहित पवारांचा टोला; वैभव चव्हाणच्या मृत्यूवरून सरकारवर घणाघात