![]()
ग्रामीण युवक आणि महिलांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या पुण्यातील मिटकॉन फोरम फॉर सोशल डेव्हलपमेंटला ‘एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला. एशिया सोशल इम्पॅक्ट अँड सस्टेनेबिलिटी अवॉर्ड्स २०२६ अंतर्गत हा सन्मान देण्यात आला. एशिया एक्सलन्स फोरमच्या वतीने मुंबईतील द ऑर्किड हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘कौशल्य से रोजगार : एसीजी – मिटकॉन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर रुरल युथ अँड विमेन’ या उपक्रमासाठी संस्थेचा गौरव करण्यात आला. या उपक्रमातून आतापर्यंत ६,००० हून अधिक युवक आणि महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणामुळे त्यांची रोजगारक्षमता आणि आर्थिक स्वावलंबन वाढवण्यास मदत झाली आहे. प्रशिक्षण उद्योगांच्या गरजांनुसार दिले जाते आणि रोजगाराच्या संधींशी जोडले जाते. एसीजीच्या सहकार्याने मिटकॉन शिरवळ, जि. सातारा; तळेगाव, जि. पुणे; आणि डहाणू, जि. पालघर येथे कौशल्य विकास केंद्रे चालवते. येथे सौर तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन व दुचाकी दुरुस्ती, उत्पादन, आरोग्य सेवा आणि वस्त्रोद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते. तांत्रिक प्रशिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्ये, मुलाखतीची तयारी आणि रोजगाराच्या संधींशी जोडणीवरही भर दिला जातो. प्रशिक्षणार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यमापनही केले जाते. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांचा तांत्रिक, औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रांतील करिअरकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. युवकांमध्ये उद्योजकता आणि स्वयंरोजगाराबाबत जागरूकता वाढत असून, काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे वळत आहेत. उद्योगसंस्था, सरकारी यंत्रणा आणि स्थानिक समुदाय यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जातो. उद्योगांच्या बदलत्या मनुष्यबळाच्या गरजांनुसार प्रशिक्षण दिले जाते. इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि सौर ऊर्जेतील कौशल्यांना प्रोत्साहन देतानाच महिलांचा तांत्रिक व्यवसायांमधील सहभाग वाढवण्यावरही लक्ष दिले जाते. मिटकॉन फोरमचे संचालक डॉ. गणेश खामगळ यांनी या आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा स्वीकार केला यावेळी सीएसआर व्यवस्थापक कोमल गोंजारी, उपाध्यक्ष राहुल शेळके, नित्यानंद तिवारी, सुहास परिहार, हर्षदा पाटील इ. उपस्थित होते. या पुरस्कारामुळे ग्रामीण भागातील कौशल्य विकासासाठी संस्थेच्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून ग्रामीण युवक व महिलांची रोजगारक्षमता वाढविणे, आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, या उद्दिष्टांच्या दिशेने मिटकॉन फोरम फॉर सोशल डेव्हलपमेंट सातत्याने कार्यरत असून, संस्थेच्या संबंधित कार्याची राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
Source link
मिटकॉन फोरमला कौशल्य विकासासाठी आशिया पुरस्कार:ग्रामीण युवक आणि महिलांसाठीच्या उपक्रमाला ‘एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ऑफ द इयर’ सन्मान