Headlines

व्यावसायिकावर गोळीबार करून 11 लाखांचे दागिने लुटले:उत्तर प्रदेशातील तीन आरोपींविरुद्ध मकोका; पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश




पुण्यात मोटारचालक व्यावसायिकावर गोळीबार करून ११ लाखांचे दागिने लुटल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. व्यावसायिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपींची नावे अविनाश कृष्णचंद्र त्रिपाठी (वय ४३), मोहम्मद शोएब वसीम खान सिद्दीकी (वय ३६) आणि सुरेंद्र रामचंद्र पाल (वय ३२) अशी आहेत. त्रिपाठी सध्या क्रिस्टल सोसायटी, बकोरी, अहिल्यानगर रस्ता येथे राहतो. तो मूळचा उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील तिलकनगरचा आहे. सिद्दीकी आझादनगर, बाराबंकी येथे, तर पाल राभिलवाल हैदरगा, बाराबंकी येथे राहतो. त्रिपाठी नगर रस्त्यावरील एका सोसायटीत रखवालदार म्हणून काम करत होता. तक्रारदार व्यावसायिकांचे कार्यालय वाडेबोल्हाई परिसरात आहे. ५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ते शिरसवाडी गावातून नगर रस्त्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी त्रिपाठी, सिद्दीकी आणि पाल यांनी त्यांची मोटार अडवली. आरोपींनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून व्यावसायिकावर गोळीबार केला आणि त्यांच्या गळ्यातील २२ तोळ्यांच्या दोन सोनसाखळ्या हिसकावून नेल्या. गोळीबारात व्यावसायिक गंभीर जखमी झाले. लोणीकंद पोलिसांनी तपास करून पसार आरोपींना अटक केली. तपासात त्रिपाठी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश, शिक्रापूर तसेच पुण्यातील कोरेगाव पार्क आणि हडपसर पोलीस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि खंडणीसाठी अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. व्यावसायिकावर गोळीबार करून लुटण्याचा कट त्रिपाठीने साथीदारांसोबत रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी त्रिपाठी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मकोका लावण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे पाठवला. आयुक्तांनी नुकतेच कारवाईचे आदेश दिले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त अबिनाशकुमार आणि सहायक आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक स्वाती खेडकर, सहायक निरीक्षक देवदास शेवाळे, गजानन कागणे, गणेश दळवी, शुभम सातव, विठ्ठल केदारी आणि ज्योती कुटे यांनी कारवाईत सहभाग घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *