![]()
टोरंट पॉवरचा प्रस्तावित वीज प्रकल्प भीमाशंकर अभयारण्याबाहेर आहे, त्यामुळे त्याचा संबंध भीमाशंकरशी जोडू नये, असे आवाहन ग्रामस्थांनी केले. प्रकल्पामुळे गाव आणि परिसराची बदनामी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भीमाशंकरचे सरपंच दत्तात्रय हिले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांची बैठक झाली. बैठकीला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ अनेक वर्षांपासून परिसरातील पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करत असून वनविभागाला सहकार्य करत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. जंगलतोड आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाला ग्रामस्थांचा विरोध आहे. ग्रामस्थांच्या दाव्यानुसार, वीज प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड भीमाशंकरमध्ये नसून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात, अभयारण्याबाहेर होत आहे. प्रकल्पाचा उल्लेख भीमाशंकरमधील वृक्षतोडीशी जोडल्याने भाविक आणि पर्यटकांमध्ये गैरसमज होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. नाशिक कुंभमेळा २०२७ च्या तयारीसाठी भीमाशंकर परिसरात विकासकामे सुरू आहेत. मंदिराचा सभामंडप, पायरीमार्ग, मंदिर परिसरातील कॉरिडॉर आणि वाहनतळ या कामांचा त्यात समावेश आहे. ही कामे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची ग्रामस्थ आणि शासन काळजी घेत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीतील ठरावांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित शासकीय विभागांना देणार असल्याचे सरपंच दत्तात्रय हिले यांनी सांगितले. नेमका वाद काय? रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरंट पॉवरचा सायडोंगर-१ हा तीन हजार मेगावॉट क्षमतेचा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. विजेची मागणी कमी असताना पाणी वरच्या जलाशयात चढवायचे आणि मागणी वाढल्यावर त्यातून वीज तयार करायची, अशी या प्रकल्पाची योजना आहे. प्रकल्पासाठी सुमारे २३३ हेक्टर वनजमीन वळवण्यात आली आहे. ३२ हजार ४९० झाडे तोडण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे. पर्यावरण आणि स्थानिक आदिवासींच्या वनहक्कांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत आंदोलकांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विरोधानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस झाडे तोडण्याचे काम थांबवण्यात आले. शक्य तितक्या झाडांचे पुनर्रोपण करण्यास कंपनीला सांगितल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.
Source link
वीज प्रकल्प भीमाशंकर अभयारण्याबाहेर असल्याचा ग्रामस्थांचा दावा:गावाची बदनामी टाळण्याचे आवाहन; पर्यावरणपूरक विकासकामे सुरू ठेवण्याची मागणी