Headlines

पुण्यात 'बाल पुस्तक जत्रा २०२६' सुरू:३० एप्रिलपासून गणेश कला क्रीडा मंच येथे ज्ञान-मनोरंजनाचा मेळावा




पुण्यात मुलांसाठी ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ही जत्रा भरवली जाईल. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, हा या जत्रेचा मुख्य उद्देश आहे. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि ‘संवाद पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जत्रेचे उद्घाटन होईल. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि मुख्य संयोजक राजेश पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. या जत्रेत बालसाहित्यावर आधारित १०० हून अधिक पुस्तक दालने असतील. याशिवाय जादूचे प्रयोग, पपेट शो, नाट्यनगरी कार्यशाळा, ग्रामीण व साहसी खेळ आणि विविध खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी खाद्यजत्रा हे देखील प्रमुख आकर्षण असणार आहे. जत्रेमध्ये प्रवेश विनामूल्य आहे. १ मे पासून मुलांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होईल. यामध्ये मकरंद टिल्लू यांचा विनोदी कार्यक्रम ‘हसण्याची बायारकी’, चैताली माजगावकर यांचा ‘बाहुल्यांचा खेळ’ आणि मुलांचे लाडके पात्र ‘चिंटू’चे निर्माते चारुहास पंडित यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल. २ मे रोजी ‘स-संविधानाचा!’ हे बालनाट्य सादर केले जाईल, तसेच डॉ. अमेय पांगारकर ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा अभ्यासात कसा वापर करावा यावर मार्गदर्शन करतील. ३ मे रोजी प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्यासोबत कथा-कवितांची सफर घडेल, तर सदानंद काले भारतीय वायुसेनेचे पराक्रम आणि विमानांची प्रात्यक्षिके सादर करतील. जत्रेच्या शेवटच्या दिवशी, ४ मे रोजी पालकांसाठी ‘मुलांचा स्क्रीन टाइम कसा कमी करावा’ यावर श्रुती पानसे आणि स्मिता वळसंगकर संवाद साधतील. सायंकाळी संबळ वादन आणि गोंधळाने या महोत्सवाचा समारोप होईल. महापौर मंजुषा नागपुरे यांनी ही जत्रा केवळ पुस्तक प्रदर्शन नसून मुलांच्या सर्वांगीण विकासाचा उत्सव असल्याचे म्हटले आहे. मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सर्व पालक आणि शिक्षकांना आपल्या मुलांसह या ज्ञानोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *