Headlines

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पायल झांबरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली:हुंडाबळी रोखण्याचे आवाहन; पायल यांच्या मृत्यूच्या तपासाची मागणी




पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर परिसरातील श्रीरामनगर येथे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पायल झांबरे यांच्या माहेरी जाऊन पवार कुटुंबीयांची भेट घेतली. पायल यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि घटनेची माहिती घेतली. न्याय मिळेपर्यंत कुटुंबीयांच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक दिवाळीत हुंड्यासाठी छळ झालेल्या मुलींच्या मृत्यूच्या घटना समोर येणे ही वेदनादायी बाब असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. महाराष्ट्रात एकही मुलगी हुंड्याची बळी ठरू नये, अशी लक्ष्मीपूजनावेळी प्रार्थना करते. एकही हुंडाबळी न घडणारी दिवाळी हीच आपल्यासाठी खरी दिवाळी असेल, असे त्यांनी सांगितले. पायल यांच्या मृत्यूमागे हुंड्यासाठी छळ, मानसिक त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप आहेत. शवविच्छेदन अहवाल, मोबाईल संभाषणे, आर्थिक व्यवहार आणि इतर पुरावे तपासून सखोल चौकशी करावी, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. तपासासाठी गरज असल्यास आरोपींच्या पोलीस कोठडीबाबत न्यायालयात योग्य भूमिका मांडावी आणि दोषींना शिक्षा मिळण्यासाठी अनुभवी विशेष सरकारी वकील नेमावा, असेही त्या म्हणाल्या. पायल यांच्या लहान मुलीचा ताबा माहेरच्या कुटुंबीयांना मिळावा, अशी मागणी त्यांनी महिला व बालविकास विभागाकडे केली. बालिकेच्या सुरक्षिततेचा आणि हिताचा विचार करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया तातडीने राबवावी, असे गोऱ्हे म्हणाल्या. “मी स्वतः आई आणि आजी आहे. त्या चिमुकलीला पाहून माझेही डोळे पाणावले. तिच्या आईला परत आणू शकत नाही; मात्र तिचे भविष्य सुरक्षित ठेवणे आपली जबाबदारी आहे,” असे त्या म्हणाल्या. या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. मृतदेह आढळल्यानंतर रुग्णवाहिका मिळण्यास किंवा अन्य कार्यवाहीत कथित दिरंगाई झाली असल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भेटीवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, महिला आघाडी संपर्कप्रमुख कांता पांढरे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे आणि स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे, आश्लेषा खंडागळे व मेघना गिडनावर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *