![]()
केरळमधील रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यप्रशिक्षक म्हणून २५ वर्षे काम करणारे अरुण लाल यांना यंदाचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ते ‘लिटल अर्थ स्कूल ऑफ थिएटर’चे कलात्मक संचालक आहेत. पुण्यातील रुपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कारात मानचिन्ह आणि ७५ हजार रुपये रोख दिले जातात. सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील श्रीराम लागू रंग-अवकाश येथे समारंभ होईल. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या सिक्कीम केंद्राचे संचालक आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे मानकरी सौती चक्रवर्ती यांच्या हस्ते अरुण लाल यांना पुरस्कार दिला जाईल. समारंभानंतर अरुण लाल दिग्दर्शित ‘मट्टीया’ नाटकाचा प्रयोग होणार आहे. तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराचे हे १९ वे वर्ष आहे. रंगभूमीतील योगदानासाठी कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. २००४ मध्ये तन्वीर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे आई-वडील दीपा आणि डॉ. श्रीराम लागू यांनी पुरस्कार सुरू केला. याआधी प्रसाद वनारसे, लकी गुप्ता, गणेश मंदार्थी, रुतुपर्ण बिस्वास आणि दुष्यंत गुणशेखर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. अरुण लाल यांनी ३० हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला असून, विविध भाषा आणि शैलींतील ३५ हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. यात बालनाट्यांचाही समावेश आहे. पारंपरिक सादरीकरण, शारीरिक अभिनय आणि केरळची कलरिपयट्टू युद्धकला यांचा त्यांच्या नाट्यशैलीवर प्रभाव आहे. २०१५ मध्ये त्यांना केरळ संगीत नाटक अकादमीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राज्य पुरस्कार मिळाला. २०१९ मध्ये META चा सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक पुरस्कार आणि २०२२ मध्ये ‘चविट्टू’ चित्रपटासाठी ५२ व्या केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. त्यांना अवनावन कदंब पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
Source link
अरुण लाल यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर:16 नोव्हेंबरला सौती चक्रवर्ती यांच्या हस्ते पुण्यात पुरस्कार प्रदान