![]()
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामती येथे जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सुनील तटकरे यांनी बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार हेदेखील उपस्थित होते. जवळपास 40 ते 45 मिनिटे ही चर्चा सुरू होती. अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच पाडवा असल्याने या भेटीला राजकीय आणि भावनिक अशा दोन्ही दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “दादांशिवाय पाडव्याच्या दिवशी बारामतीत येण्याचा दु:खद क्षण आमच्यावर आला आहे. गेल्या 30 वर्षांपासून आम्ही दरवर्षी पाडव्याच्या दिवशी येथे येत आहोत. मात्र, दादांशिवाय बारामती आणि पाडवा हे मनाला पटत नाही. तरीही दादांच्या चरणी नतमस्तक व्हावे, या भावनेतून आज येथे आलो आहे.” विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार? दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. विलिनीकरणासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या नेतृत्वाकडे असल्याचे त्यांनी सूचित केले. याबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, पक्षाच्या पातळीवर या विषयासंदर्भात सुनेत्रावहिनी निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे पक्षाशी संबंधित कोणताही निर्णय त्यांच्या स्तरावर घेतला जाईल. तसेच, शरद पवार हे गेल्या सहा दशकांपासून देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा निर्णय तेच घेतील, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सध्या नेमकी काय चर्चा सुरू आहे, याची आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. “मी गेल्या तीन-चार दिवसांपासून माझ्या गावी होतो. अलीकडच्या काळात काही राजकीय घडामोडी घडल्या असतील, तर त्याबाबत मला माहिती नाही,” असे म्हणत तटकरे यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. त्यांच्या या विधानामुळे विलिनीकरणाच्या चर्चेवर पक्षाची अधिकृत भूमिका काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय शिरसाट यांची टीका दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चेवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. सकाळी विलिनीकरणाच्या चर्चा होतात, दुपारी एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये केली जातात आणि रात्री पुन्हा वेगळ्याच चर्चा रंगतात, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडींवर निशाणा साधला. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकीकडे विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे नेत्यांच्या वक्तव्यांमधून वेगवेगळे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत केलेली 45 मिनिटांची चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. ‘उद्ध्वस्त करतो, बघून घेतो’ अशा धमक्या चालणार नाहीत:मी सुद्धा पाटील’, सतेज पाटलांचा चंद्रकांत पाटलांना इशारा गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ डोळे वटारले, तरी त्यांचे राजकीय साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असा इशारा दिला होता. त्यांच्या या विधानाला सतेज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सरकारी पदाचा आणि सत्तेचा वापर करून धमक्या देऊ नका. ‘उद्ध्वस्त करतो, बघून घेतो’ अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत. मीसुद्धा पाटील आहे, अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले. सविस्तर वाचा….
Source link
पाडव्याच्या दिवशी सुनील तटकरे बारामतीत:सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर म्हणाले…