![]()
भाजपचे आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षात आता भारतीय जनता युवा मोर्चाने उडी घेतली. जिल्ह्यात काँग्रेसची झालेली राजकीय वाताहत आणि पराभवाच्या नैराश्यातूनच काँग्रेस नेते भाजप नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचा आरोप भाजयुमोचे शहराध्यक्ष विजय कुलथे यांनी केला. विजय कुलथे म्हणाले की, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि भाजपच्या विकासकामांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेसचे नेते बेताल वक्तव्ये करत आहेत. युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आमदार कोठे यांचा एकेरी उल्लेख करत केलेली टीका राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही. दंड थोपटणे किंवा छाती बडवणे ही भाजपची संस्कृती नसली, तरी या गैरसमजात कोणी राहू नये. काँग्रेस नेत्यांच्या पातळीवर उतरून त्याच भाषेत उत्तर देण्याची ताकद आमच्यातही आहे. आम्ही राजकीय शिस्त पाळतो, त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी बोलताना भान ठेवावे, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा कुलथे यांनी दिला. प्रणिती शिंदेंनी किती निधी आणला? विजय कुलथे म्हणाले की, खासदार प्रणिती शिंदे या तब्बल तीन टर्म आमदार राहिल्या आहेत. या दीर्घ कार्यकाळात त्यांनी मतदारसंघासाठी नेमका किती विकासनिधी आणला? आणि कोणती कामे केली? याचा हिशोब जनतेसमोर मांडावा. दुसरीकडे, आमदार देवेंद्र कोठे यांनी अवघ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात आणलेल्या विकासनिधीची काँग्रेसने याच्याशी तुलना करून पाहावी. केवळ पोकळ आरोप-प्रत्यारोप करू नये. विकासकामांबाबत उत्तर देण्यासाठी समोर यावे.या वेळी भाजयुमोचे सरचिटणीस विश्वनाथ प्याटी उपस्थित होते. आमदार सुभाष देशमुख म्हणाले,
या वाईटातून चांगलेच होईल..! काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या या संपूर्ण शाब्दिक वादावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुभाष देशमुख यांनी अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “एखादी घटना अनवधानाने घडली असेल, तर या वाईटातूनही काही तरी चांगले निष्पन्न होईल. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते संबंधितांना योग्य ती समज देतील, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.
Source link
सोलापूर भाजप-काँग्रेस वाद तापला:दंड थोपटणे ही भाजपची संस्कृती नाही; अशा गैरसमजात राहू नका, कोठे-नरोटेंच्या वादात भाजयुमोची उडी, कुलथेंचा इशारा