![]()
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य केले असताना, आता भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2019 मध्ये राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असताना बंटी पाटील यांनी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोनवरून धमकावल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. यासंदर्भात आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय सतेज पाटील यांच्या संपत्तीबाबत प्रश्न उपस्थित करत तिची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना महायुतीच्या नेत्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्या राजकीय भूमिकेवर, नेतृत्वावर आणि 2019 मधील सत्तास्थापनेच्या घडामोडींवर भाष्य केले. गेल्या 15 दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुती आणि तिच्या नेत्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महायुतीतील सर्व पक्ष एकत्र असल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. बंटी पाटलांना मुख्यमंत्री व्हायचे आहे; मात्र त्यासाठी समजूतदारपणा हवा चंद्रकांत पाटील म्हणाले की, महायुतीतील सर्व पक्ष एकत्रितपणे काम करत असताना महाविकास आघाडीमध्ये मात्र सतेज पाटील यांचाच प्रभाव दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या संघर्षात सक्रियपणे दिसले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. प्रत्येक ठिकाणी स्वतःचेच नेतृत्व पुढे आणण्याचा आणि इतरांना मागे ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सतेज पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे; मात्र त्यासाठी केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा असून चालत नाही, तर समजूतदारपणाही आवश्यक आहे, असे ते म्हणाले. गेल्या 15 दिवसांतील सतेज पाटील यांची भूमिका पाहता त्यांचे वागणे एखाद्या लहान मुलाला अपेक्षित वस्तू मिळाली नाही, तर ते जसे नाराज होऊन हातपाय आपटते, त्याप्रमाणे असल्याची बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून त्यांनी हसन मुश्रीफ आणि आपल्यावर सातत्याने टीका केल्याचेही ते म्हणाले. ‘आम्ही अध्यादेश काढला, पण काँग्रेसने देशाची घटनाच बदलली’ गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावरून सतेज पाटील यांनी लोकशाहीचा खून झाल्याची टीका केली होती. याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या ऐतिहासिक निर्णयांचा दाखला दिला. गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 13 सदस्य निवडून आले, तर महायुतीचे 12 सदस्य विजयी झाले. मतांच्या आकडेवारीतही महायुतीला 5 हजार 100 मते, तर विरोधी गटाला 4 हजार 900 मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ जागांच्या संख्येवरून लोकशाहीचा मुद्दा उपस्थित करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. सरकारने गोकुळच्या हितासाठी अध्यादेश काढला असून, प्रशासक नियुक्त झाल्यास पुन्हा निवडणुकीची प्रक्रिया करावी लागली असती. ही परिस्थिती टाळण्यासाठी अध्यादेश काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही केवळ अध्यादेश काढला, मात्र काँग्रेसच्या काळात देशाची घटनाच बदलण्यात आली होती, असे म्हणत त्यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाचा उल्लेख केला. 2019 मध्ये सोनिया गांधींना धमकावल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा चंद्रकांत पाटील यांच्या भाषणातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे 2019 मधील सत्तास्थापनेच्या घडामोडींबाबत त्यांनी केलेला आरोप. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला बहुमत मिळाले होते. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले 144 आमदारांचे संख्याबळ असतानाही भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून मतभेद निर्माण झाले. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. याच काळात सतेज पाटील यांनी शरद पवार यांच्या मदतीने जयपूर येथे जाऊन भूमिका मांडली होती, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसने सरकार स्थापन केले नाही, तर आम्ही 40 जणांचा स्वतंत्र गट करून सरकारमध्ये सहभागी होऊ, अशी धमकी सतेज पाटील यांनी सोनिया गांधी यांना दिल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंग असल्याचे सांगत वेळ पडल्यास ते सादर करण्याची तयारी असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच या घटनेचा व्हिडिओही आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. सोनिया गांधी यांचे कोल्हापुरातील एका जवळच्या मित्राशी संबंध असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी त्या व्यक्तीचे नाव उघड केले नाही. आपण संबंधित व्यक्तीची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता, सतेज पाटील यांच्याकडून धमकी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ कोणतेही रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ त्यांनी सभेत सार्वजनिक केल्याचे नमूद करण्यात आलेले नाही. ‘तुमचे वडील स्कूटरवर फिरायचे, आता एवढी प्रॉपर्टी कुठून आली?’ सतेज पाटील यांच्या संपत्तीवरूनही चंद्रकांत पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. राजकारणात काम करताना वैचारिक पातळी आणि नैतिकता जपली पाहिजे. दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या कारभाराकडेही पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. सतेज पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यांचे वडील डी. वाय. पाटील याच कोल्हापूर शहरात स्कूटरवरून फिरत होते. मात्र, आज सतेज पाटील यांच्याकडे किती संपत्ती आहे, ती कुठून आली, हे त्यांनी जाहीर करावे. त्यांच्या संपत्तीबाबत माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही त्यांनी केली. सतेज पाटील यांच्यावर टीका करताना त्यांनी काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत, असा टोला लगावला. डी. वाय. पाटील यांच्या काळात असलेली परिस्थिती आणि आताची संपत्ती याबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी या संपत्तीच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणी केली. गोकुळ दूध संघाच्या कारभारावरूनही त्यांनी सतेज पाटील यांना लक्ष्य केले. दूध उत्पादकांच्या हितासाठी असलेल्या संस्थेचा वापर वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा आणि आर्थिक फायद्यासाठी होऊ नये, असे ते म्हणाले. गोकुळमध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘मुख्यमंत्र्यांनी मनात आणले तर एका दिवसात साम्राज्य उद्ध्वस्त होईल’ भाषणाच्या शेवटी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत सतेज पाटील यांना थेट आव्हान दिले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनात आणले, तर तुमचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. एवढीच धमक असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे कामासाठी जाऊ नका, तर राहुल गांधी यांच्याकडूनच काम करून घ्या, असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना तेल लावलेला पैलवान संबोधत त्यांनी त्यांच्यावर विरोधकांकडून अनेक प्रयत्न झाले, तरी ते शांतपणे परिस्थिती हाताळत असल्याचे सांगितले. राज्यात विविध आंदोलने सुरू असतानाही फडणवीस यांनी प्रत्येक विषयावर आक्रमक प्रतिक्रिया दिलेली नाही. गोकुळच्या मुद्द्यावरही त्यांनी एकदाच भूमिका मांडली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. शेवटी राजकारणात संयम आणि योग्य भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी सतेज पाटील यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू झालेला वाद आता केवळ दूध संघाच्या राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नसून, 2019 मधील सत्तास्थापना, काँग्रेसचे नेतृत्व, वैयक्तिक संपत्ती आणि राज्यातील सत्तासंघर्ष अशा अनेक मुद्द्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपांवर सतेज पाटील काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. गोकुळवर अखेर महायुतीचा झेंडा, राजेश पाटील नवे अध्यक्ष:सतेज पाटलांना धक्का; शासननियुक्त 4 मतं ठरली निर्णायक कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात गेले अनेक दिवस सुरू असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या सत्तासंघर्षाचा अखेर निकाल लागला आहे. गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचे उमेदवार आणि माजी आमदार राजेश पाटील यांची अधिकृतरीत्या निवड झाली असून, संघाची सत्ता आता महायुतीच्या ताब्यात गेली आहे. आज पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या मतदान प्रक्रियेत राजेश पाटील यांनी १६ मते मिळवत बाजी मारली, तर काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना १३ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत राज्य शासनाने नियुक्त केलेल्या चार संचालकांची मते विजयासाठी अत्यंत निर्णायक ठरली. सविस्तर वाचा……
Source link
‘मुख्यमंत्र्यांनी मनात आणले तर एका दिवसात साम्राज्य उद्ध्वस्त होईल’:चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा