Headlines

तुळजाभवानी मंदिर परिसरात आगीचा भडका:दर्शनासाठी आलेल्या भाविकांची धावपळ, 24 तासांत दुसरी घटना




पाडव्याच्या सणानिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक तुळजापुरात दाखल झाले असतानाच मंदिर परिसरात आगीची घटना घडली आहे. शहरातील बिडकर तलाव परिसरातील डोंगरावर आज दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसू लागल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही काळ भाविकांची सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले. जवानांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाडव्याच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. महाराष्ट्रासह परराज्यांतूनही भाविक दर्शनासाठी येत आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर भाविकांची वर्दळ वाढली असून दर्शनासाठी येणाऱ्यांना याच परिसरातून मंदिरात प्रवेश दिला जात आहे. अशा गर्दीच्या वेळी बिडकर तलाव परिसरातील डोंगरावर आग लागल्याने भाविकांमध्ये घबराट पसरली. डोंगरावरील वाळलेली झाडे आणि कचरा आगीच्या भक्ष्यस्थानी बिडकर तलाव परिसरातील डोंगरावर अचानक आगीचा भडका उडाला. सुरुवातीला लहान स्वरूपात दिसणारी आग काही वेळातच पसरत गेली. डोंगरावरील वाळलेली झाडे, झुडपे आणि परिसरात टाकण्यात आलेला कचरा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यामुळे आगीचा विस्तार वाढला आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाले. आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसू लागल्याने मंदिर परिसरात असलेल्या भाविकांचे लक्ष तिकडे गेले. काही भाविकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धाव घेतली. गर्दीच्या ठिकाणी आग लागल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डोंगरावरील आग अधिक पसरू नये, यासाठी जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे मंदिर परिसरातील संभाव्य मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, फटाक्यांमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक तपास आणि माहिती घेतली जात आहे. 24 तासांत आगीची दुसरी घटना; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर विशेष म्हणजे तुळजापुरात गेल्या 24 तासांत आगीची ही दुसरी घटना आहे. सणासुदीच्या काळात मंदिर परिसरात हजारो भाविकांची गर्दी होत असते. अशा परिस्थितीत आगीसारखी घटना घडल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंदिर परिसरातील स्वच्छता, वाळलेली झाडे आणि कचऱ्याची विल्हेवाट तसेच अग्निशमन यंत्रणेच्या तयारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. अक्कलकोटमध्ये पार्किंगमधील 5 ते 6 ट्रक जळून खाक दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्येही आगीची मोठी घटना घडली आहे. सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील एका खासगी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकना अचानक आग लागली. सुरुवातीला एका ट्रकने पेट घेतला. त्यानंतर आगीने बाजूला उभ्या असलेल्या अन्य ट्रकनाही आपल्या विळख्यात घेतले. या आगीत आतापर्यंत जवळपास 5 ते 6 ट्रक जळून खाक झाल्याची माहिती आहे. पार्किंगमध्ये आणखी अनेक ट्रक उभे असल्याने आग पसरण्याची भीती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे तुळजापूरमध्ये मंदिर परिसरातील डोंगराला आग लागून भाविकांमध्ये घबराट पसरली, तर दुसरीकडे अक्कलकोटमध्ये पार्किंगमधील ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सोलापूर जिल्ह्यातील या दोन घटनांमुळे अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हेही वाचा…. ‘मुख्यमंत्र्यांनी मनात आणले तर एका दिवसात साम्राज्य उद्ध्वस्त होईल’:चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य केले असताना, आता भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2019 मध्ये राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असताना बंटी पाटील यांनी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोनवरून धमकावल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. यासंदर्भात आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय सतेज पाटील यांच्या संपत्तीबाबत प्रश्न उपस्थित करत तिची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *